Thane: उल्हासनगर महापालिका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील वर्तन, आयुक्तांकडे तक्रार
By सदानंद नाईक | Published: July 29, 2023 01:34 PM2023-07-29T13:34:43+5:302023-07-29T13:35:18+5:30
Ulhasnagar Municipal Corporation: महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'चलती क्या बाहेर' अश्या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे तक्रार केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'चलती क्या बाहेर' अश्या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी महापालिकेचे लक्तरे वेशीवर टांगायला नको म्हणून, अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हासनगरात कुछ भी हो शकता है, असे वक्तव्य एका माजी महापालिका आयुक्तांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते. ते वाक्य महापालिकेला तंतोतंत लागू पडत आहे. महापालिका मालमत्ता विभागात लिपिक पदावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अश्लील चाळ्याबाबत लेखी निवेदन दिल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. सन-२०१७ साली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्यानंतर, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलां कर्मचाऱ्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करून, 'चलती है क्या बाहेर' असे वारंवार बोलला आहे. मात्र भीती पोटी महिलेने त्यावेळी तक्रार केली नाही. त्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर महिलेचे सुटकेचा श्वास टाकला. मात्र पुन्हा अधिकाऱ्यांची गेल्यावर्षी महापालिकेत नियुक्ती झाल्यावर, महिला कर्मचाऱ्यांशी लगटपणा वाढला.
अखेर... या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने १० दिवसांपूर्वी आयुक्त अजीज शेख यांना याबाबत निवेदन देऊन, न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. या निवेदनानंतर आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी करून कारवाईचे संकेत दिल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी लोकमत सोबत बोलतांना दिली. तसेच यापूर्वीही एक अशीच तक्रार आल्याचे आयुक्त म्हणाले.
दरम्यान महिला कर्मचाऱ्याने एका स्थानिक न्यूज चॅनेलवर याप्रकारचा उलघडा केल्यावर, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. महापालिकेच्या विशाखा महिला समितीकडे याबाबत तक्रार करून न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया या महिला कर्मचाऱ्याने दिली. तसेच सन-२०१७ साली सदर अधिकाऱ्याने महापालिकेचे काम सांगून एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्याचा गौप्यस्फोट महिला कर्मचाऱ्याने केला. महापालिकेत यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव गुलदस्त्यात?
महापालिका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप करून खळबळ उडून दिली. मात्र त्या अधिकाऱ्यांचे नाव अद्यापही जाहीर केले नाही. मात्र आयुक्त अजीज शेख यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव नमूद असून आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यांची कानउघडनी करून कारवाईचे संकेत दिले आहे.