स्वच्छ नव्हे हे तर विद्रुप ठाणे; शहराच्या प्रत्येक चौकात राजकीय बॅनरबाजीला उधाण
By अजित मांडके | Published: September 23, 2023 04:05 PM2023-09-23T16:05:37+5:302023-09-23T16:05:54+5:30
राजकीय बॅनरबाजीमुळे ठाणे शहर स्वच्छ नव्हे तर विद्रुप ठाणे होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे : केंद्राच्या वतीने घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात ठाणे महापालिका देखील सहभागी आहे. त्यामुळे ठाण्याचा पहिला नंबर यावा यासाठी महापालिका शर्तीचे प्रयत्न करीत आहे. परंतु दुसरीकडे स्वच्छ ठाण्याला सध्या शहराच्या विविध भागात अनाधिकृतपणे लावण्यात आलेल्या राजकीय बॅनरबाजीमुळे ठाणे शहर स्वच्छ नव्हे तर विद्रुप ठाणे होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरात स्वच्छता लीग हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार यात खाडी किनारे स्वच्छ करण्याबरोबर आपला परिसर स्वच्छ रहावा यासाठी शाळकरी मुलांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याची सुरवातही झाली आहे. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज शहर स्वच्छतेचे महत्व ठाणेकरांच्या मनावर बींबविन्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ठाणेकरांना शिकवितांना महापालिकेचेच आता स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात फिरल्यानंतर समोर येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते अगदी घोडबंदर, कळवा, दिवा आदी भागातही सध्या अनाधिकृत बॅनर लावले गेल्याचे दिसत आहे. यातही प्रत्येक पक्षाची यात चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे दोन गट झाले, त्यानंतर राष्टÑवादीचेही दोन गट झाल्याने या दोनही गटांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून बॅनर लावून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रत्येक महत्वाचा चौक, उड्डाणपुलाखाली, मासुंदा तलाव, उपवन तलाव आदींसह इतर तलावांच्या ठिकाणी देखील या राजकीय पक्षांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत.
तीनहात नाका ते अगदी घोडबंदर भागात ज्या ठिकाणी मेट्रोचा शेवटचा पिलर आहे, त्या प्रत्येक पीलवर देखील अशाच स्वरुपाचे बॅनर लावण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय बॅनरबाजीमुळे शहर अधिकच विद्रुप झाल्याचे दिसत आहे. परंतु महापालिकेने यातील एकाही बॅनरवर कारवाई करण्याची हिम्मत अद्यापही दाखविलेली नाही. तसेच अशा प्रकारचे बॅनर लावणाºयांच्या विरोधात गुन्हे दाखल देखील झालेले नाहीत. त्यामुळे शहर स्वच्छतेचा नारा देणाºया ठाणे महापालिकेला ही अस्वच्छता दिसत नाही का? असा सवाल आता ठाणेकर करु लागले आहेत.