"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

By अजित मांडके | Published: July 5, 2024 04:15 PM2024-07-05T16:15:30+5:302024-07-05T16:16:10+5:30

नवे चिन्हही मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

Thane Jitendra Awhad tried to reach the new party and symbol to the voters through the banner | "१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता ठाण्यातील अजित पवार गटाने मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघासाठी नजीब मुल्ला यांनी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळे आगामी निवडणुक शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विरुध्द नजीब मुल्ला यांच्यात होणार असल्याचेच चित्र आहे. आव्हाड मागील १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. परंतु आता पक्ष आणि चिन्हही गेल्याने नवीन पक्ष आणि चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच कळवा, मुंब्य्रात सध्या अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु या निवडणुकीत ठाण्यातील आव्हाडांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून मतांची पेरणी सुरु झाली आहे. जेव्हा पासून पक्षाचे दोन तुकडे झाले तेव्हा पासून नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या मतदार संघात तळ ठोकण्यास सुरवात केली आहे. विविध प्रकारचे शिबिर, शासनाच्या योजना, विकास कामे आदींसह आरोप प्रत्यारोप करीत आव्हाडांना शह देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरु आहे. आव्हाडही त्यांना प्रतिउत्तर देत आव्हान पेलत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात शासनाकडून मुल्ला यांनी या मतदार संघासाठी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यातून विकास कामे करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यात मागील १५ वर्षात या मतदार संघात कशी चुकीच्या पध्दतीने कामे झाली, याचा पदार्फाश केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मतदार संघात विकास कामे झालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे मुल्ला हे आमदार नसतांनाही त्यांनी या मतदार संघासाठी निधी आणला आहे. मात्र आव्हाड हे आमदार असतांनाही त्यांना निधी मिळत नसल्याने त्यांनी याविरोधात थेट विधानसभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तसा आव्हाड विरुध्द मुल्ला संर्घष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

परंतु मागील १५ वर्षात आपण काय केले हे जनतेला सांगण्यासाठी सध्या कळवा, मुंब्य्रात विविध आशयाचे फलक झळकू लागले आहेत. त्या फलकांवर १५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची, सफर अभी बाकी है..., १५ वर्षे प्रगतीची, सुख सुविधांची अन, सृजनशीलतेची, १५ वर्षे जिद्दीची, सातत्याची आणि प्रयत्नांची, अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून आपण या कालावधीत काय काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न आव्हाडांकडून सुरु आहे. तसेच बदलला पक्ष आणि त्याचे चिन्ह हे देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे या हेतून तशा आशायचे देखील फलक मुंब्रा, कळवा भागात लावण्यात आले आहेत. आता त्याचा किती परिणाम होणार हे आता येणाºया विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Thane Jitendra Awhad tried to reach the new party and symbol to the voters through the banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.