ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:49 PM2017-08-29T20:49:59+5:302017-08-29T21:35:06+5:30
मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते.
ठाणे, दि. 29 - मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. तास-न्-तास अडकून राहण्यापेक्षा काहींनी रेल्वे मार्गावरुनच घर आणि कामावर जाणे पसंत केले. दुपारी १ वाजेपर्यंत काहीशा धीम्या गतीने सुरु असलेली रेल्वे सेवा दुपारी १.३० वाजेनंतर पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे जाणारी (अप) आणि कल्याण तसेच कर्जत कसा-याकडे जाणारी वाहतुकीवरही तिचा परिणाम झाला. दुपारपासून सायंकाळपर्यंत अनेक प्रवासी हे ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली तसेच कल्याण येथील रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कल्याण डोंबिवलीतून ठाण्याकडे येण्यासाठी दुपारी बसलेले प्रवासी मुंब्रा आणि कळवा येथून रेल्वे मार्गातून कसेबसे ठाण्यापर्यत पोहचले. परंतु, त्यांना रिक्षा तसेच खासगी कार सेवेच्या लुटमारीचाही फटका बसला. मात्र, जे प्रवासी रेल्वेत अडकले होते, त्यांना रात्री उशिरापर्यंत गाडया सुरु न झाल्यामुळे त्यांचे चांगलेच हाल झाले. यात विशेषत: लहान मुले, महिला आणि वृद्धांना त्याचा चांगलाच फटका बसला.
* रेल्वे मार्ग पाण्याखाली...
कळवा, दिवा तसेच मुंब्रा येथील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला होता. तर कळवा रेल्वे स्थानकातील फलाटांच्या समप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.
मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे.
ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणनं वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत. तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या परिस्थित नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार तसंच गरजेनुसार आपल्या नजिकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिका-यांशी अथवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१) ठाणे १ विभाग
- गडकरी उपविभाग - ३ फिडर बंद – सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित
- कोपरी उपविभाग – १ फिडर बंद - सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित
- किसान नगर उपविभाग – डी.टी.सी. बंद – सुमारे ३ हजार ग्राहक प्रभावित
२) वागळे विभाग – २५ फिडर – सुमारे १,२५ ,००० हजार ग्राहक प्रभावित
३) ठाणे २ विभाग
- कळवा उपविभाग – ४ फिडर बंद – सुमारे ४५ हजार ग्राहक
- विकास उपविभाग – ४ फिडर – सुमारे १० हजार ग्राहक
- पावरहाउस – माहिती लवकरच उपलब्ध होईल
४) ठाणे ३ विभाग - सुमारे ११०००० हजार ग्राहक
५) भांडुप विभाग – १ सब स्टेशन व ४ फिडर - सुमारे १६००० हजार ग्राहक
६) मुलुंड विभाग – ५ सब स्टेशन - सुमारे ७६००० हजार ग्राहक
७) वाशी विभाग
- एरोली उपविभाग - ४ फिडर – २० हजार ग्राहक
- कोपर खैरणे उपविभाग – १ ट्रान्सफॉर्मर – १ हजार ग्राहक
- वाशी उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
८) नेरूळ विभाग – प्रभावित नाही
९) पनवेल विभाग
- पनवेल १ (भिंगरी) उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
- उरण उपविभाग – १ उपविभाग – १००० ग्राहक