ठाणे, कल्याण, कुर्ला, अंधेरीसह बोरिवली मोबाइलचोरीचे हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:13 PM2019-06-19T23:13:28+5:302019-06-19T23:13:49+5:30
मे अखेरपर्यंत दीड हजार मोबाइलची चोरी; पोलिसांची माहिती
- भवानी झा
ठाणे : मध्य आणि पश्चिम या रेल्वेमार्गांवरील ठाणे, कल्याण व कुर्ला तसेच अंधेरी आणि बोरिवली या रेल्वेस्थानकांच्या हद्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ या वर्षभरात अंदाजे चार हजार दोनशे, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत सुमारे दीड हजार मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दिली.
दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे होणाऱ्या गर्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढले आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दररोज सरासरी ६५ ते ७० मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. तसेच पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाºया चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८० टक्के गुन्हे हे मोबाइलचोरीचे, तर २० टक्के गुन्हे हे इतर वस्तूंच्या चोरीचे असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यातच, मोबाइलचोरीचे प्रकार प्रामुख्याने गर्दी असणाºया सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत घडत आहेत. मोबाइलचोरट्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुष चोरट्यांचे प्रमाण अधिक आहे. २०१८ या वर्षभरात रेल्वेतून मोबाइल चोरणाºया चार हजार १६२, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत एक हजार ४५२ चोरटे जेरबंद झाल्याची माहिती लोहमार्ग वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी लोकमतला दिली.
प्रवाशांमध्ये जनजागृती
मोबाइलचोरट्यांवर आळा बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांनी मोबाइल व सामानाची काळजी घेण्याबाबत उद्घोषणा केली जाते. रेझिंग डे सप्ताहानिमित्त व रेल्वे प्रवासी संघटनांसोबत बैठकांचे आयोजन करून प्रवासांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतात.