ठाणे-कल्याण-वसई जलवाहतुकीचे काम लवकरच, डोंबिवली, काल्हेर, कोलशेत येथे होणार जेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:08 AM2018-11-07T03:08:13+5:302018-11-07T03:09:01+5:30
कल्याण-ठाणे-वसई या जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीची कामे होणार आहेत.
डोंबिवली - कल्याण-ठाणे-वसई या जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीची कामे होणार आहेत. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी या जेट्टींचे बांधकाम करणार आहे. ठाणे-कल्याण-वसई या जलमागार्साठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे.
ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे केंद्र सरकारकडे गेल्या साडेचार वर्षांपासून पाठपुरावा करत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांना पाठबळ लाभले. या पाठपुराव्यामुळेच केंद्र सरकारने कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला. त्याचे सादरीकरण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आला होता. कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प होणार असून पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई हा ६४५ कोटी रुपयांचा जलमार्ग विकसित करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येत असून डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होत आहे.
वाहतुकीचा पर्याय
जेएनपीटी ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने हे काम करणार आहे. जसजसे काम पुढे सरकेल, तसतसा केंद्राकडून निधी प्राप्त होणार आहे, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वेव्यतिरिक्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.