ठाण्यात अवतरला खली; पठाणी पोशाखाने संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:28 AM2019-03-04T00:28:50+5:302019-03-04T00:28:58+5:30
लोकलमधून प्रवास करताना संशयावरून काबूलच्या मोहम्मद शेर खान याला लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले.
पंकज रोडेकर
ठाणे : लोकलमधून प्रवास करताना संशयावरून काबूलच्या मोहम्मद शेर खान याला लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले. तो ज्या डब्यात बसला होता, त्या डब्याची श्वान पथकाद्वारे कसून तपासणी केली. पण, कोणताही अनुचित प्रकार नसल्याचे समोर आल्यावर लोकल पाच मिनिटांत टिटवाळ्याला रवाना झाली. भारदस्त देह आणि ८.२ इंच उंची असलेल्या या पठाणला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्याला पाहून जणू ठाण्यात खली अवतरला की काय, अशा चर्चा सुरू होती. दरम्यान, त्याची रात्री उशिरापर्यंत दहशतवादविरोधी पथकाद्वारे चौकशी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रविवारी सकाळी साधारणत: ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाचा फोन खणखणला. पलीकडून आवाज आला, साहेब मुंबई पोलीस दलातून पोलीस अंकु श राठोड बोलतोय. मी सीएसएमटी-टिटवाळा लोकलने प्रवास करत असून त्यामध्ये भारदस्त देहबोली आणि पठाणी पोशाख धारण केलेली व्यक्ती आहे. तो संशयास्पद वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, स्थानक उपप्रबंधक र.वि. नांदुस्कर यांनी प्रबंधक आर.के. मीना यांच्यासह रेल्वे कंट्रोल, ठाणे सुरक्षा पोलीस बल तसेच लोहमार्ग पोलिसांसह श्वान पथकाला तातडीने ही माहिती दिली. जेव्हा कॉल आला, तेव्हा ती लोकल विक्रोळी येथून ठाण्याकडे निघाली होती. लोकल येईपर्यंत आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथकाचे जवान ठाण्यातील फलाट क्रमांक-२ येथे दाखलही झाले होते. लोकल साधारणत: ११.२० वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक-२ वर लागली. पोलिसांनी लगेच ५२७६ बी या डब्याचा ताबा घेतला. या डब्यातील प्रवाशांना बाहेर येण्याचे आवाहन करून लगेचच डबा खाली केला. मोहम्मद शेर खान याला डब्यातून उतरवत ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आणले. त्यानंतर, श्वान पथकाद्वारे डब्याची कसून तपासणी करण्यात आली. श्वान पथकास पाहून नागरिकांनी एकच गर्दी केली. डब्यातून खलीसारख्या दिसणाऱ्या शेर खानला पाहून प्रबंधक कार्यालयाला गराडा पडला होता. त्याला ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सुरुवातीला चौकशी केली. तोपर्यंत दहशतवादविरोधी पथकही ठाण्यात दाखल झाले.
>दहशतवाद विरोधी पथकाने काबुली पठाणची चौकशी सुरू झाली. यावेळी त्याच्याकडे पासपोर्ट मिळाला. आपण २१ फेब्रुवारी रोजी अफगाणमधून निघाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दिल्ली, नागपूर, मुंबई असा प्रवास करत असून डायफ्रूटचा व्यापारी असल्याचेही त्याने सांगितले. त्याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही.