मातृत्वाच्या ओढीने अखेर 'तिला' मिळालं घर, हरवलेल्या माऊलीची दोन वर्षांनी घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:37 PM2022-06-09T17:37:22+5:302022-06-09T17:37:47+5:30
मानसिक ताण तणावामुळे २६ नोव्हेंबर २०२० रोजी ५० वर्षांची महिला घराबाहेर पडली. त्यानंतर नैराश्येच्या गर्तेत ती भरकटत गेली.
ठाणे : दोन वर्षांपूर्वी भरकटलेल्या अवस्थेत हरवलेल्या त्या माऊलीची अखेर घरवापसी झाली. मातृत्वाच्या ओढीने ५० वर्षांच्या महिलेला तिचे घर परत मिळाले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या या माऊलीला तिच्या घरी पाठविण्यास मनोरुग्णालयाला अखेर यश आले. मुलाची आईला घरी नेण्याची इच्छा नसली तरी तिला लागलेल्या मुलांच्या ओढीने आणि मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे तिला घरी जाता आले. मंगळवारी या महिलेची घरवापसी झाली असल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली.
मानसिक ताण तणावामुळे २६ नोव्हेंबर २०२० रोजी ५० वर्षांची महिला घराबाहेर पडली. त्यानंतर नैराश्येच्या गर्तेत ती भरकटत गेली. दोन वर्षांनी ती बोईसर पोलिसांना आढळली असता बेघर आणि अनोळखी रुग्ण म्हणून तिला संबंधित पोलिसांनी मनोरुग्णालयात कायदेशीर कार्यवाही करून ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले. सुरुवातीला या महिलेला आजार असल्याने तिला काही आठवत नव्हते. त्यामुळे तिच्याकडून तिची माहिती काढणे मनोरुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर आव्हानच होते.
दोन-तीन महिने उपचार
दोन ते तीन महिने उपचार दिल्यानंतर आणि समाजसेवा अधीक्षकांनी सतत संवाद साधल्यानंतर एप्रिल महिन्यात तिची ओळख पटली. ती महालक्ष्मी येथील एका झोपडपट्टीत राहत असल्याचे तिने सांगितले. तिच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी मनोरुग्णालयाने हिंदू सेवा संघाची मदत घेतली. प्रयत्नाअंती तिच्या नातेवाइकांचा पत्ता लागला.
महिलेला घरी जाण्याची ओढ
या महिलेला तिच्या घरी जाण्याची ओढ होती. ती सतत मला घरी जायचे आहे, माझ्या मुलांकडे जायचे आहे अशा तगादा लावत असल्याचे समाजसेवा अधीक्षक रंजना दोनोडे यांनी सांगितले. तिच्या मुलाचा पत्ता मिळाल्यावर त्याने खोली छोटी असल्याचे कारण देत आईला तुर्तास नेण्यास नकार दिला. त्यावेळी त्याला आणि त्या बरे झालेल्या महिला मनोरुग्णाला मासिक अभ्यागत समितीसमोर उभे करण्यात आले. त्यावेळीही त्या मुलाने तेच कारण दिले. महिन्याभरानंतर घेऊन जाणार असल्याचे त्याने सांगितले. परंतु या माऊलीची आपल्या मुलांना भेटण्याची इच्छा तीव्र होती. त्यामुळे या मुलाचे समुपदेशन केल्यानंतर तो शेवटी आज आपल्या आईला घरी घेऊन गेला. यावेळी घरी जाण्याचा आनंद माऊलीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियंका बानोकर यांच्या उपचारामुळे तसेच, मनोरुग्णतज्ज्ञ सुजाता चौघुले, यशोदा बैंगणकर, दोनोडे यांच्या प्रयत्नामुळे माऊलीची घरवापसी झाली.