ठाणे लोकसभा क्षेत्रात दीड लाख मतदार दुबार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:46 AM2018-10-23T02:46:25+5:302018-10-23T02:46:38+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदवली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदवली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामागे बोगस मतदानाची शक्यता असल्याने ही दुबार नोंदणी झालेली नावे तातडीने मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून मतदार याद्यांचा आढावा घेण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान अनेक मतदारांची दोन ते तीन ठिकाणी नोंदणी असल्याचे प्रकार समोर येवू लागले आहेत. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रात १ लाख ५६ हजार ७७९ मतदारांची दुबार नोंदणी असल्याची बाब शिवसेनेने उघडकीस आणली आहे. त्यामध्ये ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ७११, बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३१ हजार ४५९, कोपरी पाचपखाडीत २१ हजार, मीरा भार्इंदरमध्ये १० हजार ५५८, ओवळा माजिवडामध्ये ३३ हजार ६१ आणि ठाणे विधानसभा क्षेत्रात १८ हजार ९७९ मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी आहे.
या माध्यमातून आगामी निवडणुकीत बोगस मतदानाची शक्यता असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. त्यानुसार दुबार नोंदणी असलेली ही नावे तत्काळ मतदार यादीतून वगळावीत या मागणीसाठी त्यांनी कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
सध्या सुरू असलेली मतदार नोंदणी प्रक्रि या काटेकोरपणे राबविण्यात यावी. एकच नाव अनेक मतदार याद्यांमध्ये अनेकदा नोंदविले जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.