राज ठाकरेंसाठी ठाण्याची जमीन सुपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:43 AM2017-09-05T02:43:14+5:302017-09-05T02:43:44+5:30

मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील

 Thane land fertile for Raj Thackeray | राज ठाकरेंसाठी ठाण्याची जमीन सुपीक

राज ठाकरेंसाठी ठाण्याची जमीन सुपीक

Next

ठाणे : मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात येणारे परप्रांतीयांचे लोंढे हे सर्वप्रथम ठाण्यात येतात व तेथून राज्याच्या अन्य भागात जातात, असे मत त्यांनी शुक्रवारी दादरमधील मुलाखतीत व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या महापालिका क्षेत्रात परप्रांतीयांची समस्या अधिक आहे, असे ठाकरे म्हणाले. राज्य सरकार राबवत असलेला मेट्रो प्रकल्प परप्रांतीयांकरिता राबवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. मनसेचा परप्रांतीयविरोध कायम असून विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर तो अधिक तीव्र होईल, असे संकेत आहेत. मागीलवेळी ठाकरे यांनी कल्याणमध्ये रेल्वे परीक्षार्थींवर हल्ला करुन आंदोलनाला सुरुवात केली. नंतर आंदोलनाचे लोण मुंबई शहरात पसरले. आताही ठाणे जिल्ह्यात मनसेच्या आंदोलनाची ठिणगी पडली तर नवल वाटायला नको.
मुंबई शहरावरील वर्चस्वाकरिता सध्या भाजपा व शिवसेनेत संघर्ष सुरु आहे. वर्चस्वावरुन या दोन हत्तींमध्ये झुंज सुरु असताना राज यांनी आपल्याकरिता अनुकूल अशा ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या आठवड्यात राज यांनी ठाण्याचा दौरा करुन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मनसेने परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन रण पेटवले तर शिवसेनेलाही त्या मुद्द्यावर भूमिका घ्यावी लागते व त्याचा लाभ भाजपाला होतो. त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

Web Title:  Thane land fertile for Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.