भिवंडीत लॅपटॉप चोरी; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आरोपीला अटक
By नितीन पंडित | Updated: May 14, 2024 18:37 IST2024-05-14T18:37:24+5:302024-05-14T18:37:58+5:30
Bhiwandi Crime News; गोदामातून गुजरात अहमदाबादकडे कंटेनरमध्ये घेऊन चाललेल्या लॅपटॉपची चालकानेच चोरी केल्याचा प्रकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत शांतिनगर पोलिसांनी केलेल्या कोंबींग ऑपरेशन मध्ये उघड झाला असून चालकाकडून ११ लॅपटॉप जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

भिवंडीत लॅपटॉप चोरी; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आरोपीला अटक
- नितीन पंडित
भिवंडी - गोदामातून गुजरात अहमदाबादकडे कंटेनरमध्ये घेऊन चाललेल्या लॅपटॉपची चालकानेच चोरी केल्याचा प्रकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत शांतिनगर पोलिसांनी केलेल्या कोंबींग ऑपरेशन मध्ये उघड झाला असून चालकाकडून ११ लॅपटॉप जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.मशरूफ मेहबुब खान असे अटक आरोपीचे नाव आहे.
पिंपळास गावात असलेल्या इंडीनेट लॉजिस्टीक प्रायव्हेट लिमीटेड येथून चंदा ट्रान्सपोर्ट मधून ७ मे रोजी टाटा टेम्पो क्रमांक एमएच ०४ केयु २९०८ वरील चालक मुश्रीफ खान यास विश्वासाने लॅपटॉप व इतर माल भरून बडोदा व अहमदाबाद येथे घेऊन जाण्यासाठी ताब्यात दिला होता.चालकाने विश्वासघात करून कंटेनर मधील २१ लॅपटॉप इंडीनेट लॉजिस्टीकचे अहमदाबाद येथील गोदामा मध्ये न देता रस्त्यातच त्यामधील लॅपटॉप काढून कंटेनर रस्त्याकडेला उभा करून पळून गेला होता.
कंटेनर मालक किरण जालींदर उन्हाळे यांनी जीपीएस सिस्टीमने कंटेनर पहिला असता त्यामधील माल चोरीला गेल्याचे लक्षात आले.याच दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत कोंबिग ऑपरेशन सुरु असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक रात्री गस्त करीत असताना पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिलाल मस्जीदचे समोर आरोपी मशरूफ मेहबुब खान वय २४ वर्षे रा.नेहरूनगर, कल्याण रोड यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये डेल कंपनीचे महागडे १६ लाख ६६ हजार ३२२ रुपये किमतीचे एकुण ११ लॅपटॉप आढळून आले.त्याचेकडे लॉपटॉप बाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली.त्या दरम्यान कंटेनर मालक किरण उन्हाळे यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार वरून आरोपीस शांतीनगर पोलिसांनी कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.ही कामगिरी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हेगारास अटक करून मुद्देमाल जप्त केल्या बद्दल पोलिस कामगिरीची प्रशंसा केली जात आहे.