लाचखोरीत ठाणे आघाडीवर
By admin | Published: November 30, 2015 02:19 AM2015-11-30T02:19:01+5:302015-11-30T02:19:01+5:30
या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे
ठाणे : या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर इतरांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस खात्यातील पोलिसांनाच अटक होणाऱ्या लोकसेवकांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. ठाणे परिक्षेत्रातील सहा युनिटमध्ये ठाण्याने आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक ५६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर-ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर हे नवे युनिट तयार करण्यात आले आहे. याचदरम्यान, २०१५ या वर्षात एसीबीकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील १३१ सापळे लावण्यात आले. त्याचमध्ये लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत.
२०१४ या वर्षाप्रमाणेच २०१५ च्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गात कारवाई केली. त्या वेळी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याला पक डण्यात आले. २०१५ च्या जानेवारी -२२ नोव्हेंबर या अकरा महिन्यांत एकूण १३१ सापळे लावून १५८ लोकसेवकांना अटक केली. त्या केलेल्या कारवाईत १८ लाखांची सर्वाधिक तर ३० रुपयांची सर्वात कमी लाच मागणाऱ्यांना जेलमध्ये जाण्याची वेळी ओढवली आहे. जानेवारीत ४ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला पकडले.
तसेच ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना अटक केली. त्यातील एका शिपायाकडे करोडो रुपयांचा ऐवज निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचबरोबर बदलीसाठी सर्वाधिक १८ लाखांची मागणी करणे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह निरीक्षकाच्या हाती बेड्या पडल्या आहेत. तर जिल्हा परिषद (ग्रामीण) पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून १९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती.
शासननिर्मित खात्यात काम करणारे लोकसेवक श्रेणीनिहाय पाहिल्यास क्लास वन श्रेणीत २०, क्लास टूमध्ये २६ आणि क्लास थ्रीमध्ये ९५ जणांचा समावेश आहे. अशा घटना या वर्षी जास्त प्रमाणात उघडकीस येणे म्हणजे नागरिकांमध्ये जागृती वाढल्याचे दिसते. तसेच एसीबी विभागाने वेळोवेळी घेतलेल्या मोहिमांचा हा प्रतिसादच असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)