Thane: तरुणाचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय
By जितेंद्र कालेकर | Published: March 21, 2024 09:30 PM2024-03-21T21:30:49+5:302024-03-21T21:31:01+5:30
Thane News: मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता (२३, रा. सावरकरनगर, ठाणे) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची तसेच प्रत्येकी दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षाही आरोपींना भोगावी लागणार आहे.
ठाण्याच्या सावरकरनगर भागात आरोपीसह बॉबी सहोता हे चौघेही मित्र वास्तव्याला होते. बॉबी आणि शिवम तिवारी यांची एक मैत्रिण होती. शिवमने बॉबीबद्दल काहीतरी उलटसुलट माहिती तिला दिली. ही माहिती तिने बॉबीला सांगितली. याचाच जाब बॉबीने शिवमला विचारला. तेंव्हा शिवमने त्याला ६ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटण्यासाठी सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेजवळ बोलवले. तिथे तिवारी याच्यासह त्याच्या आशिषकुमार आणि राहूल या साथीदारांनी चाकूचे वार करीत बॉबी आणि त्याचा मित्र अजय सिंग याच्या पोटावर गंभीर दुखापत केली. तर अन्य एक मित्र संतोष पांडे यांच्या डाव्या हाताला दुखापत केली. यामध्ये बॉबी याचा मृत्यू झाला होता. तर अजय याच्या खूनाचा प्रयत्न झाला होता.
याच खटल्याची सुनावणी २१ मार्च २०२४ रोजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एल. भोसले यांच्या न्यायालयात झाली. यामध्ये सरकारी वकील वर्षा चंदने यांनी १५ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.