ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ४२ वर्षांतील खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:33 AM2019-03-22T03:33:28+5:302019-03-22T03:33:48+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघ आधी देशात द्वितीय क्रमांकावर होता. त्यातून ठाणे व कल्याण अशा दोन मतदारसंघांची विभागणी झाली. आता या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक तिसऱ्यांदा होत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघ आधी देशात द्वितीय क्रमांकावर होता. त्यातून ठाणे व कल्याण अशा दोन मतदारसंघांची विभागणी झाली. आता या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक तिसऱ्यांदा होत आहे. याप्रमाणेच आधीच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील या तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका याआधी झाल्या. या चारही लोकसभा मतदारसंघांत तत्कालीन२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. पालघर जिल्ह्याच्या विभाजनानंतर यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्यात ठाणे या मूळच्या लोकसभा मतदारसंघासह कल्याण आणि भिवंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघांची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांचा १९७७ ते २०१४ पर्यंतचा आढावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन ठाणे व कल्याण मतदारसंघांची निर्मिती झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपा- शिवसेना युतीचे वर्चस्व राहिले आहे; पण प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने धडक दिली आणि राष्टÑवादीचे संजीव नाईक यांच्या रूपाने विजयश्री खेचून आणली. त्यानंतर, म्हणजे २०१४ ला या मतदारसंघावर भाजपा-सेना युतीने भगवा फडकवून सेनेचे राजन विचारे खासदार झाले.
ठाणे मतदारसंघातील २५ प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये विचारे यांनी पाच लाख ९५ हजार ३६४ मते घेऊन संजीव नाईक यांचा पराभव केला. नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. यावेळी तृतीय क्रमांकावर असलेले मनसेचे अभिजित पानसरे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. त्यावेळी जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील ६७ उमेदवारांपैकी सर्वाधिक २६ उमेदवार ठाणे मतदारसंघात होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत ठाणे या नावाने लोकसभा मतदारसंघ तयार झाला. पहिल्या निवडणुकीला नऊ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात यावेळी सुमारे १९ लाख ९१ हजार मतदार आहेत. आधीपासूनच महत्त्वाचा ठरलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा देशात मोठा मतदारसंघ आहे.
याआधी सलग १३ वर्षांपासून शिवसेनेच्या तब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ मागे मध्यंतरी काँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडीच्या ताब्यात आणि आता पुन्हा विचारेंच्या रूपाने सेनेकडे आहे. १९७७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीतील रामभाऊ म्हाळगी येथे खासदार होते. भारतीय लोक दल या पक्षाचे ते उमेदवार होते. त्यांनी दोन लाख ३० हजार ४०२ मते घेऊन काँग्रेसचे पी.एस. देशमुख यांचा पराभव केला होता. देशमुख यांना एक लाख ४७ हजार ५६ मते मिळाली होती. दोन्ही प्रतिस्पर्धी राष्ट्रीय पक्षांचे होते. उर्वरित सहा उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते.
१९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून म्हाळगी यांनी एक लाख ८५ हजार मते घेऊन काँग्रेसचे (इं.) उमेदवार पी.एम. हेगडे यांचा पराभव केला होता. हेगडे यांना एक लाख ७५ हजार ५५६ मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार एस.एस. प्रधान हे ३६ हजार ६२५ मते घेऊन द्वितीय आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (यु.) उमेदवार बी.एस. दगडू ३४ हजार १३ मते घेऊन तृतीय क्रमांकावर होते. या चुरशीच्या निवडणुकीत जनता (एस.) पक्षाचे पी.के. ऐलानी यांना १८ हजार ८७६ मते, तर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व्ही.बी. ससाणे यांना पाच हजार ६०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत म्हाळगी यांनी १० हजार २७५ मतांची आघाडी घेऊन हेगडे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीच्या तीन वर्षांनंतर खासदार म्हाळगी यांचे निधन झाले. त्यानंतर, १९८४ च्या पोटनिवडणुकीत जनता पक्षाच्या जागी भारतीय जनता पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढवण्यात आली. या पक्षाने डोंबिवलीचे जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे (इं.) शांताराम गोपाळ घोलप (मुरबाड) यांनी तीन लाख १५ हजार ४९० मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला होता. जगन्नाथ पाटील यांचा पराभव केवळ १३ हजार ३१९ मतांनी झाला होता. या दोन राजकीय पक्षांसह उर्वरित १० अपक्ष उमेदवार होते.
पाच वर्षांनंतर १९८९ साली मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक झाली. पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपाने घोलप यांच्या ताकदीचे रामचंद्र गणेश कापसे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी कापसे यांनी ८८ हजार मतांची आघाडी घेऊन घोलप यांचा पराभव केला. कापसे यांनी चार लाख ६७ हजार ८९८ मते घेऊन विजय मिळवला होता. घोलप यांना तीन लाख ७९ हजार ६०९ मते मिळाली होती. त्यावेळी भारिपचे रामभाऊ रामचंद्र आढाव (१२,००२) तृतीय क्रमांकाचे, तर बहुजन समाज पक्षाचे अॅड. राहुल तानाबाजी हुमणे (४४९२) चौथ्या क्रमांकावर होते. अपक्ष परमानंद सेवकराम औछानी (३१३४) यांच्यासह सात अपक्ष आणि दूरदर्शी व लोकदल बी या राजकीय पक्षांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. त्यावेळी दोन वर्षांच्या कालावधीनंतर १९९१ मध्ये या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी या मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
१९९२ च्या निवडणुकीत होते २0 उमेदवार
१९९२ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे(आय) हरिवंशसिंह रामकबल सिंह (२,७४,६११) यांचा भाजपाचे कापसे यांनी एक लाख २८ हजार ३०७ मतांची आघाडी घेऊन पराभव केला होता. या निवडणुकीत तब्बल २0 उमेदवार रिंगणात होते.
या निवडणुकीत ४६ हजार ९७९ मते घेत जनता दलाचे परशुराम टावरे तृतीय क्रमांकावर होते. जनता पार्टीचे डी.पी. गवई, दूरदर्शी पार्टीचे पारसनाथ रामलखन मिश्रा या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे ती रंगतदार झाली होती.