Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण?
By धीरज परब | Published: April 8, 2024 07:55 AM2024-04-08T07:55:48+5:302024-04-08T07:58:25+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघावरून (Thane Lok Sabha Constituency) भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक (Sanjiv Nailk) यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे.
- धीरज परब
मीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघा वरून भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु चिन्ह हे शिवसेनेचे धनुष्यबाण सुद्धा असू शकते असे वक्तव्य सुद्धा त्यांनी केल्याने महायुतीचे नाईक हे उमेदवार असतील असे संकेत मिळत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच ठाणे लोकसभा मतदारसंघातील आहेत. परंतु ठाण्या वरून भाजप व शिवसेना शिंदे गटात घोडे अडले असून शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठा ठाणे लोकसभा मतदार संघा वरून लागली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला की भाजपच्या वाट्याला येणार हेच अजून निश्चित नाही. आमदार प्रताप सरनाईक हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याने मविआ चे राजन विचारे यांच्या समोर तगडा उमेदवार देण्यासाठी संजीव नाईक यांच्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाईक हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात.त्यातच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन राजन विचारे हे दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्ह वरून लढल्यास त्याचा फायदा देखील नाईक यांना होणार अशी अटकळ असू शकते.
शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक , ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे इच्छुक असून ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे . भाजपकडून या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. डॉ. सहस्त्रबुद्धे हे सक्रिय सुद्धा झाले होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे नाव मागे पडले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार म्हणून निवडून आलेले आणि सध्या भाजपात असलेले संजीव नाईक हे आता उमेदवार म्हणून जोरदार प्रयत्नशील आहेत.
शिवसेना व भाजपने अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर केलेले नसले तरी भाजपा कडून संजीव नाईक यांनी भाईंदरच्या बालाजी नगर मधून त्यांच्या प्रचाराची एक प्रकारे सुरुवात रविवारी केली. बालाजी नगर मधील एका सभागृहात त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या सोबत बैठक घेतली . त्यात भाजपचे काही माजी नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना स्वतः संजीव नाईक यांनी देखील पक्षाने आपल्याला उमेदवारीच्या अनुषंगाने करण्यास हिरवा कंदील दिला असून त्याची सुरवात आपण बालाजी नगर मधून करत आहोत . जवळपास ९९ टक्के आपली उमेदवारी निश्चित असून चिन्ह हे कमळ की धनुष्यबाण असेल हे आपणास माहित नाही. परंतु आपली तीव्र इच्छा ही कमळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवण्याची आहे. परंतु पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत.
नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचा दावा हा बळकट केल्याचे देखील मानले जात होते. तर संजीव नाईक हे भाजपाचे जरी असले तरी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून देखील ते निवडणूक लढण्याची शक्यता सुद्धा बळावली आहे. त्यामुळे शिवसेने कडून ठाणे लोकसभा मतदारसंघा साठी महायुतीचे उमेदवार म्हणून संजीव नाईक यांच्या नावाची घोषणा करण्याचा दबाव वाढवण्याची शक्यता आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाने पारंपारिक शिवसेनेचा गड असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडल्यास किंवा शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचे नाईक यांची उमेदवारी निश्चित केल्यास राजकिय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.