ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच...
By अजित मांडके | Published: April 5, 2024 08:26 PM2024-04-05T20:26:06+5:302024-04-05T20:26:29+5:30
ठाणे लोकसभा मतदार संघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत.
ठाणे : महायुतीच्या मेळाव्यात शुक्रवारी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांची एक छबी पाहून सभागृहातील महायुतीतील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र ते होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत. ते सभागृहात येताच महायुतीच्या मेळाव्यात त्यांना पाहिलांदा संबोधित करण्याची संधी देण्यात आली.
महंत यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. त्यानंतर मी हिंदीत बोलतांना लोकांना आवडते असे सांगत त्यांनी हिंदीत भाषण करायला सुरवात केली. यावेळी ते म्हणाले की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे. असे सांगत या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.
ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी युतीच्या नेत्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. महायुतीच्या या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नसेल तरी युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे.