ठाणे लोकसभेच्या सहा मतदारसंघांत ३३ हजार ६०९ मतदारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:50 PM2019-09-24T23:50:49+5:302019-09-24T23:51:07+5:30
मतदार नोंदणीस प्रतिसाद; ओवळा - माजिवडा मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी
ठाणे : लोकसभेपाठोपाठ लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मतदारांची नव्याने नोंद केली त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात ३३ हजार ६०९ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधीक मतदारांची नोंद ही ओवळा-माजिवडा या मतदारसंघात ९ हजार ३३७ इतकी झाली आहे. या नव मतदारांचा फायदा कोणात्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ७० नवीन मतदारांची तर १० तृतियपंथीची नोंद झाली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नवमतदार व कोणतीही व्यक्ती मतदानासारख्या पवित्र हक्का पासून वंचित राहू नये याकरीता निवडणूक विभागाकडून ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात नवीन मतदारनोंदणी कार्यक्र म राबविला. त्यादेखील मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात ९९ हजार २८५ इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली. यामध्ये २० ते २९ या वयोगटातील सर्वाधिक ३५ हजार ३११ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर, ८० व त्या पुढील वयोगटातील मतदरांच्या संख्येत ११९ ने घट झाल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. १८ ते १९ वयोगटातील मतदारंच्या संख्येत १४ हजार ३४५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत हे मतदार पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात २४ लाख ३ हजार ९३७ मतदार
लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठाणेलोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदारांची नोंद झाली होती. तर आता राबविलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेत ३३ हजार ६०९ मतदारांची नव्याने वाढ झाली आहे. यामुळे ठाणे लोकसभेच्या मतदारांची संख्या २४ लाख ३ हजार ९३७ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९ हजार ३३७ इतकी झाली आहे. त्याखालोखाल मीराभार्इंदर मतदारसंघात ६ हजार ८०१ मतदारंची वाढ झाली आहे. तर, सर्वातकमी ३ हजार ३७८ इतकी ऐरोली विधानसभा मतदार संघात वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहापुरात सुमारे अडिच लाख मतदार
शहापूर : सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या शहापूर विधानसभा मतदारसंघात २0१९ च्या मतदारयादीनुसार २ लाख ४८ हजार ७0८ मतदार आहेत. यामध्ये महिला १ लाख १७ हजार ९३३, तर पुरुष १ लाख ३0 हजार ७७५ असल्याची माहिती अति. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिली.
या मतदारसंघातील २२६ गावे व २६५ पाड्यांमध्ये १0८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत. ३२६ मतदान केंद्र असून जवळपास २५00 कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी आवश्यकता आहे. मतदान अधिकारी १ ते ३ अशी वर्गवारी करून निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना जोंधळे कॉलेज शहापूर-आसनगाव येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहापुरातील वन प्रशिक्षण विद्यालयात निवडणूक कार्यालय तयार करण्यात आले आहे. तालुक्यात एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयराज कारभारी हे काम पाहणार आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार निलिमा सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक भवारी व भूमिअभिलेख अधिकारी राजेंद्र लोंढे हे काम पाहणार आहेत.
डोंबिवली मतदारसंघात वाढले 9000मतदार
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ३१ आॅगस्टपर्यंत प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार तीन लाख ५१ हजार ५२६ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ८१ हजार ६८१ पुरुष, तर एक लाख ६९ हजार ८४५ महिला मतदार आहेत. डोंबिवलीत एकूण ३२३ मतदान केंद्रे असून, ३०३ मूळ आणि २० सहाय्यकारी मतदान केंद्रे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता नऊ हजार मतदार वाढले आहेत, असेही ते म्हणाले. डोंबिवली मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे, अरुण वानखेडे आदी उपस्थित होते.
सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर आहेत. मतदान केंद्रांसाठी एकूण ६१ इमारती निवडल्या असून, त्यामध्ये ३२३ मतदान केंद्रे असतील. तसेच निमशासकीय ५६ तर २६७ खासगी इमारतींचा त्यात समावेश असेल, असे पवार म्हणाले. लोकसभेप्रमाणेच स. वा. जोशी हायस्कूल हे महिला मतदारांसाठी राखीव मतदार केंद्र असेल. तेथे अधिकारीपदापासून कनिष्ठ पदापर्यंत महिला कर्मचारी कार्यरत असतील.
अधिकारी, कर्मचाºयांसाठी टपाल मतपत्रिकेची सुविधा असेल. आतापर्यंत या मतदार संघात ६४ सैनिक मतदारांच्या नावांची नोंद झाली आहे. फुले नाट्यमंदिरातच स्ट्राँग रूम असून, मतमोजणी येथे होणार आहे. मतदान केंद्रासाठीचे साहित्य वाटपही तेथूनच केले जाणार आहे. या ठिकाणी एकूण दोन हजार ५५३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार असून त्यात ३५७ पोलीस कर्मचारीही आहेत, असे त्यांनी सांगितले.