ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही; संजीव नाईक यांचा प्रचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 08:52 AM2024-04-24T08:52:45+5:302024-04-24T08:53:13+5:30
खा. विचारे यांच्यासमोर लढण्यासाठी शिंदेसेनेकडे उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपला जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
मीरा रोड : ठाण्याचा तिढा अजून सुटला नसला, तरी भाजपचे इच्छुक संजीव नाईक यांनी मात्र जागा वाटपाआधीच उमेदवार म्हणून प्रचार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शिंदेसेनेवर उद्धवसेनेने टीकेचे बाण चालवण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करूनही बालेकिल्ला राखण्यासाठी शिंदेसेनेला झगडावे लागत आहे. नाईक भाजपमधील माजी नगरसेवक, प्रमुख लोकांच्या घरोघरी भेटीगाठी घेत आहेत. निवासी संकुलातील नागरिक, समाजातील प्रमुख मंडळींच्या भेटी घेत आहेत.
खा. विचारे यांच्यासमोर लढण्यासाठी शिंदेसेनेकडे उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपला जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नाईक यांनी उघडपणे सुरू केलेला प्रचार ही शिंदेसेनेची नामुष्की आहे, असे त्यांनी म्हटले आहे, तर शिंदे गटात गेलेल्यांची अवस्था बिकट असून, ठाण्याचा गड म्हणवणाऱ्या शिंदेसेनेला भाजप जागा सोडत नाही. मग विधानसभा आणि पालिका निवडणुकीत त्यांची अवस्था किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी, असा टोला उद्धवसेनेचे मीरा-भाईंदर उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम यांनी लगावला आहे.