ठाणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : सकाळपासून सायंकाळपर्यंत शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 03:23 AM2019-05-24T03:23:49+5:302019-05-24T03:24:21+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही घोडबंदर रोड येथील कावेसर परिसरातील न्यू हॉरीझॉन स्कूल येथे ठेवून या ठिकाणी तीन विभाग केले होते.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही घोडबंदर रोड येथील कावेसर परिसरातील न्यू हॉरीझॉन स्कूल येथे ठेवून या ठिकाणी तीन विभाग केले होते. प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष व्यवस्था करून त्यांना १०० मीटरपेक्षा अधिक अंतर लांब ठेवले होते. मात्र, शहरापासून मतमोजणी केंद्र लांब असल्याने आणि उष्णतेचा पारा वाढल्याने कार्यकर्त्यांनी लांबच राहणे पसंत केले. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या ठिकाणी शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
मतमोजणी सुरू झाल्यावर महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे हे मतमोजणी केंद्रात दाखल होते. दुपारी १२ वाजेपर्यंत चौथी फेरी झाल्यामध्ये परांजपे हे पिछाडीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास परांजपे यांनी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह तेथून काढता पाय घेतला. तोपर्यंत महायुतीचे उमेदवार राजन विचारे आले नव्हते. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठामपा सभागृह नेते नरेश म्हस्के हे कार्यकर्त्यांसह तेथे आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रांपासून लांब जाण्यास सांगितले. तेव्हा शिवसैनिकांनी दुकानाचा आसरा घेतल्यावर पोलिसांनी ती दुकाने बंद करण्यास लावली. याचदरम्यान महायुतीचे उमेदवार राजन विचारे आल्यावर त्यांच्यापाठोपाठ पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक ही मंडळी मतमोजणी केंद्राजवळ आल्यावर त्यांनी विचारे यांनी घेतलेली आघाडी पाहून त्यांचे अभिनंदन करून फोटो काढले.
मागील दोनतीन दिवसांपासून शहरात उष्णतेचा पारा वाढल्याने आणि मतमोजणी केंद्र हे शहराच्या एका टोकाला असल्याने प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र येथे जाणे टाळल्याचे बोलले जात आहे. त्यातच पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त लावल्याने मतमोजणी केंद्रापर्यंत कोणालाही सोडण्यात येत नसल्याचे दिसत होते.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील न्यू होरायझन स्कूलसमोर मतमोजणीच्या वेळी होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेऊन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही ती झाली नाही. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळीही या भागातील वाहतूक सुरळीत होती.
न्यू होरायझन स्कूलच्या इमारतीमध्ये २३ मे रोजी ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भार्इंदर, ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे नियोजन होते. याठिकाणी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिक तसेच नेत्यांची आणि त्यांच्या वाहनांची गर्दी अपेक्षित धरून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गेल्या एक आठवड्यापासूनच या परिसरात रेकी करून वाहनतळांचे नियोजन केले. त्यानुसार, आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली होती. याशिवाय, नेते आणि व्हीआयपींच्या वाहनांचीही या स्कूलसमोर व्यवस्था केलेली होती. कासारवडवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकांनी दरतासांनी गस्त ठेवली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि कासारवडवलीचे किशोर खैरनार आदींचे पथक याठिकाणी तैनात होते. मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर अंतरावरच वाहनांना पूर्णपणे बंदी केली होती. पोलिसांच्या वाहनांशिवाय कोणत्याही वाहनांना याठिकाणी प्रवेश दिलेला होता. याशिवाय, मतमोजणी केंद्रावरही पोलीस, मतदान प्रतिनिधी, उमेदवार आणि मतमोजणी करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रांशिवाय प्रवेशबंदी होती. त्यामुळे गोंधळ, गर्दी आणि वाहतूककोंडीचे प्रकार टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या बंधनांमुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नाराज झाले असले तरी सर्वसामान्य नागरिक मात्र यामुळे खूष दिसत होते. कारण, मतमोजणी केंद्राच्या परिसरात राहणाºया नागरिकांना यामुळे ये - जा करणे सुकर झाले होते.
पोलिसांच्या नियोजनामुळे मतमोजणी केंद्राच्या आजुबाजूच्या परिसरात कुठेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसली नाही. तसेच, परिसरातील व्यावसायिकांसह रुग्णांनाही यामुळे दिलासा मिळाला. तर मतमोजणी केंद्राच्या परिसरात जायला न मिळालेले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी निकालाचा आनंद मोबाइल, लॅपटॉपवर पाहणे पसंत केले.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील न्यू होरायझन स्कूलसमोर मतमोजणीच्या वेळी होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही ती झाली नाही. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळीही या भागातील वाहतूक सुरळीत होती.
स्थानिक उपायुक्त अविनाश अंबुरे आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. त्यामुळेच या भागात वाहतूककोंडी झाली नाही.’’ - मधुकर पांडेय, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर
विचारेंच्या घरासमोर कंदील
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे (शिवसेना) उमेदवार राजन विचारे हे विजयी होतील, अशी चाहूल लागल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरील परिसरात आकाशकंदील लावण्यास सुरुवात केली होती. गुुरुवारी दुपारी विचारे हे आघाडीवर असल्याचे पाहून त्यांच्या कार्यालयाबाहेर महिला कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.
ठाणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विचारे आणि आघाडीचे उमेदवार तथा माजी खासदार आनंद परांजपे हे आमनेसामने होते. त्यातच, परांजपेही पूर्वश्रमी शिवसैनिक असल्याने आणि त्यांचे वडीलही शिवसेनेचे खासदार असल्याने ही लढत रंगतदार होईल, असे बोलले जात होते. दरम्यान, शिवसैनिकांना विचारे यांच्या विजयाची चाहूल लागल्याने ठाण्यातील चरई परिसरात राहणाºया विचारेंच्या घराबाहेरील परिसरात मतमोजणीच्या आदल्या दिवशी आकाशकंदील ठिकठिकाणी लावण्यात आले.
त्यामुळे या परिसरात जणू दिवाळी असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत होते. तर, गुरुवारी दुपारनंतर विचारेंनी मोठी आघाडी घेतल्यानंतर महिला कार्यकर्त्या विचारेंच्या घराबाहेर जमा होऊन जल्लोष केला.