जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
By अजित मांडके | Published: June 4, 2024 05:11 PM2024-06-04T17:11:47+5:302024-06-04T17:13:03+5:30
Thane Lok Sabha Election Result 2024 : ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
अजित मांडके, ठाणे : आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे आणि यापुढेही विकासाचाचे राजकारण करणार आहोत. परंतु काहींनी चुकीचा अप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून प्रचार करुन संभ्रम निर्माण केला. परंतु जे अशा संभ्रमाला बळी पडले त्यांना आता त्यांचा खरा चेहरा समोर येईल. परंतु आम्ही संभ्रम दूर करण्यात कमी पडलो, उमेदवार उशिराने घोषित केले, त्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम मतांवर झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर आम्ही त्यांचा संभ्रम दूर करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, काहींनी त्यांच्या विरोधात अप्रचार केला, मोदी हटावचा नारा दिला. मात्र जनेतेने त्यांना तडीपार केले असून इंडिया आघाडीचे सरकार येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील दोन वर्षात राज्याचा महायुतीने केलेला विकास आणि मागील १० वर्षात मोदी यांनी देशाचा केलेला विकास यामुळेच महायुतीला हे यश प्राप्त झाले आहे. तसेच ठाण्यातील जनेतेने देखील म्हस्के कंरवी बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार दिला असल्याचेही ते म्हणाले.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम हा ठाण्यावर होते. त्यामुळे या ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. सर्व सामान्य कार्यकर्ता हा आज खासदार झाला आहे. तर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण हे देखील ठाणेकरांनी आज दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले. ठाणेकरांनी दाखविलेल्या विश्वासाला म्हस्के हे पात्र ठरतील असेही ते म्हणाले. तर कल्याणमध्येही डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून मागील १० वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना हा विजय मिळविता आला असल्याचेही ते म्हणाले.