भाजपवर दबावासाठी ठाणे लोकसभेची खेळी; राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडल्याने शिवसेनेचा नवा डाव?
By अजित मांडके | Published: October 6, 2023 10:20 AM2023-10-06T10:20:51+5:302023-10-06T10:21:36+5:30
आमदार नाही तर खासदारकी तरी मिळू द्या यासाठीच आता हा अट्टाहास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित मांडके
ठाणे : राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती व्हावी म्हणून भाजपवर दबाव टाकण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात येत असल्याची खेळी खेळली जात असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार नाही तर खासदारकी तरी मिळू द्या यासाठीच आता हा अट्टाहास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये फारसे जुळत नाही. त्यात भाजपने ठाणे लोकसभेवर दावा केल्याने आता ही जागा भाजपला गेल्यास भाजप ठाण्यात ‘मोठा भाऊ’ होऊ शकतो, अशी भीती शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना हाच मोठा भाऊ राहावा, यासाठी शिवसेनेकडून भाजपला शह देण्यासाठी वारंवार खेळी केली जात आहे. राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होईल तसेच महामंडळांचेही वाटप होईल, अशीही आशा वाटत होती. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. परंतु, सत्ता येऊन एक वर्ष उलटल्यानंतरही राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.
‘ठाण्याचा गड’ हा शिवसेनेलाच मिळावा, यासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार भाजपवर दबावदेखील टाकला जात आहे. परंतु, ठाणे शिवसेनेला दिले तर भाजप ‘कल्याण’ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या घडामोडी सुरू असताना आता ठाणे लोकसभेचा दावा का केला जात आहे, याची माहिती शिवसेनेतीलच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
...तर लोकसभेचा हट्ट सोडण्याची शक्यता
राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटावा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना आमदारकी मिळावी, यासाठीच दबाव टाकला जात असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्याने दिली. त्यामुळे हा नेता कोण, कोणाला हवीय आमदारकी अशी चर्चा ठाण्यात रंगू लागली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला नाही तर मात्र ठाणे लोकसभेवरील दावा आणखी पक्का केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.