ठाण्याचे महापौर, 'शिंदेसेने'चे प्रवक्ते ते लोकसभेचे उमेदवार; नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास
By अजित मांडके | Published: May 1, 2024 10:49 AM2024-05-01T10:49:02+5:302024-05-01T10:49:54+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा केली.
ठाणे - महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा १ मे च्या दिवशी करण्यात आली आहे. शिवसेनेही ठाणे लोकसभा आपल्या ताब्यात ठेवली आहे. त्यामुळे आता उद्धवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना ठाणे लोकसभेत पाहावयास मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार यावरून शिंदे सेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे सेनेला यश आल्याचे दिसत आहे. त्यात शिंदे सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा केली.
कसा आहे नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास?
दोन वेळा स्विकृत सदस्य म्हणून ते पालिकेत दाखल. त्यानंतर २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले. परंतु २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते.
अखेर पक्षाला म्हस्केंची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्व पक्षीयांशी असलेल्या सखोलाच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि भाजपाला दिलेले कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीपदही बहाल करावे लागले होते. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पद त्यांना दिले.त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही ही सांभाळली. शिंदे यांचे विश्वासु समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद ही आहे.