Thane: महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, एकनाथ शिंदे यांचा आरोप
By अजित मांडके | Published: August 26, 2023 07:18 PM2023-08-26T19:18:11+5:302023-08-26T19:19:03+5:30
Eknath Shinde: महाविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन, कंगणा रणावत, नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही झाला होता. परंतु आज सीबीआयने दुध का दुध आणि पाणी का पाणी केले आहे.
- अजित मांडके
ठाणे - यापूर्वी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन, कंगणा रणावत, नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही झाला होता. परंतु आज सीबीआयने दुध का दुध आणि पाणी का पाणी केले आहे. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग कोण करत होते, हे आता स्पष्ट झालेले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ते एकनाथ शिंदे यांनी शक्तीस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे शरद पवार यांच्या बाबत त्यांना छेडले असता, शरद पवार हे जे बोलते ते कधीच करीत नसल्याचे सांगितले. परंतु अजित पवार यांना देशाचे पंतप्रधान मोदी यांचे विचार पटल्यानेच त्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. आज देश महासत्तेच्या दिशेने कसा जात आहे, हे आता त्यांना देखील उमगले आहे. त्यामुळे अजित पवारांना जे आज पटले ते कदाचित शरद पवार यांना देखील पटेल असे त्यांनी सांगितले. इंडियाच्या बैठकीला किती पक्षातील किती लोक उपस्थित होते, हे न सांगितलेलेच बरे. मात्र ते एकत्र आल्याने उलट यापुढील निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब अशी अवस्था होती. मात्र आता शासन आपल्या दारीच्या शासन लोकांच्या दारी आलेले असून लोकांच्या समस्या जागच्या जागी सोडविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद कभी मरते नही आनंद अमर आहे, असे म्हणत त्यांनी यावेळी दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एका वर्षात १०० कोटी दिले गेले आहेत. मात्र आधीच्या सरकारमध्ये केवळ अडीच कोटीच दिले गेल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी शिंदे यांच्या हस्ते राज्यातील विविध भागांसाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून २५ रुग्णवाहीकांचे वाटपही करण्यात आले.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
यावेळी चांदवडचे शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले यांच्यासह उपनगराध्यक्ष कविता उगले, नगरसेवक बाळू वाघ, निखील राऊत उपशहर प्रमुख दिपक शिरसाठ, कळवण मधील महिला आघाडी शहरप्रमुख सत्यवती आहेर यांच्यासह अनेक महिला आघाडी गण प्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच अकोला मधील माजी उपमहापौर तथा माजी जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, यांच्यासह माजी उपजिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक आदींसह इतरांना देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.