Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद

By अजित मांडके | Published: April 5, 2023 04:35 PM2023-04-05T16:35:36+5:302023-04-05T16:35:52+5:30

Mahavikas Aghadi : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी ठाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Thane: Mahavikas Aghadi's mass rally against Shinde government, three parties showed their strength | Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद

Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद

googlenewsNext

- अजित मांडके  

ठाणे - ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी ठाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाकरिता तीनही पक्षाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले होते. या मैदानात सव्वा तीन पर्यंत केवळ  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी महिला  आणि पुरुष  कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते  कार्यकर्तेच जमा झाले होते. काँग्रेसच्या एकाही नेत्याचा किंवा पदाधिकाऱ्याचा साधा थांगपत्ता ही नव्हता.अखेर पावणे चारच्या सुमारास काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते मैदानात दाखल झाले होते.पण मैदानात काँग्रेसचे अस्तिव इतर दोघांच्या तुलनेत नव्हतंच.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महाविकास आघाडीच्या मोर्च्याकरिता बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. मैदानात  सर्वात प्रथम ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचं आगमन झाले. त्यापाठोपाठ शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारें यांचे आगमन झाले. पाठोपाठ शिवसेनीकांचे जथ्येच्या जथ्ये मैदानात दाखल होत होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे कार्यकर्ते ही मैदानात जमा  होत होते. मात्र ठाण्यात उघडरित्या पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अशाप्रकारे एकत्र येत असल्याने थोडे अवघडल्यासारखे दिसून येत होते. मैदानाच्या एका कोपऱ्यात शिवसेनेचे कार्यकर्ते जमा होत होते. तर मैदानाच्या शेवटच्या टोकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होत होते. अधून मधून दोन्ही बाजूने स्वतंत्र्यपणे राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. शिवसेनीकांकडून शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचा विजय असो,धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो.उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आगे बढो याबरोबरच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात येत होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार झिंदाबाद आणि जितेंद्र आव्हाड आगे बढो अशा घोषणा देण्यात येत होत्या.

 बरोबर अडीच वाजता मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहरअध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अधिकच घोषणाबाजी सुरु झाली. दरम्यान पावणे तीनच्या सुमारास मैदानातील व्यासपीठावर शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत,अनिल परब सुनील प्रभू, सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, रमेश कोरगावकर,शिवसेनाउपनेते अमोल कीर्तिकर आदी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला पुरुष कार्यकर्त्यांनी भरून गेले होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन जोर जोरात घोषणाबाजी करतच होते.तसेच उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक होते. तसेच कार्यकर्त्यांच्या हातात रोशनी शिंदेवर झालेल्या भ्याड हलल्याचा निषेध असो, ईडी सरकार हाय हाय अशा विविध आशयाचे फलक ही होते.

मैदानाच्या बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती.व्यासपीठावरून यावेळी मोर्चेकरांना विविध सूचना करण्यात येत होत्या. बरोबर ३ वाजून ५१ मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात युवासेनाप्रमुख शिवसेनानेते आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आगमन झाले. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी व्यासपीठावर जाऊन समोरील जमलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ३ वाजून ५४ मिनिटांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरवात झाली.मोर्च्याच्या सुरवातीला तीनही पक्षाच्या महिला कार्यकर्त्यां होत्या. मोर्चा तलावपाळी येथून स्टेशन मार्गे हा मोर्चा निघाला होता. या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी देण्यात येत होती. तसेच शिवसेना शिवसेना हें गाणं वाजवलं जात होते.

बुधवारी निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक होती. काँग्रेसचे जेमतेम दीडशे ते दोनशेच्या आसपासच कार्यकर्ते दिसून आले. हें कार्यकर्तेही छत्रपती शिवाजी महाराज मैदानात न जमता ठाणे शहर काँग्रेस कार्यालयात जमा झाले होते. मोर्चा सुरु होण्याच्या काही मिनिटं आधी विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाले होते.

Web Title: Thane: Mahavikas Aghadi's mass rally against Shinde government, three parties showed their strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.