भाजपच्या संजय केळकर यांनी राखले ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:04 AM2019-10-25T01:04:07+5:302019-10-25T01:04:50+5:30
मनसेच्या इंजीनमुळे फुटला घाम; शहराच्या मध्यवर्ती भागातील मतदारांनी दिला हात
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील काँटे की टक्करमध्ये अखेर भाजपचे संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा १९ हजार २२४ मतांनी पराभव केला. अनेक महत्त्वाच्या बुथमध्ये भाजप आणि मनसेच्या मतांमध्ये फारच थोडा फरक दिसत आहे. मात्र, ठाणे शहरातील मध्यवर्ती भागाने अखेरच्या क्षणी केळकरांना तारले आणि त्यांचा विजय निश्चित झाला. मागील निवडणुकीच्या तुलनेत केळकर यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात मनसेने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ५२.४७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत येथे चार टक्क्यांनी मते कमी झाली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण साडेसत्तावीस फेऱ्या झाल्या. पहिल्याच फेरीत भाजपचे संजय केळकर यांनी ७८४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर, पुढील दोन फेऱ्यांमध्येही केळकर यांची आघाडी ४५०० च्या पुढे गेली. त्यानंतर, चौथ्या फेरीत अविनाश जाधव यांना २७७८ मते मिळाली, तर भाजपचे संजय केळकर यांना २२२५ मते मिळाली. याठिकाणी जाधव यांनी ५५३ मतांची आघाडी घेतली. परंतु, केळकर हेच आघाडीवर होते. त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत केळकर यांना नऊ हजारांची आघाडी होती. मात्र, अकराव्या फेरीत जाधव यांना ४१०० मते मिळाली, तर केळकर यांना २२३४ मते मिळाली. या फेरीत पुन्हा जाधव यांनी १८६६ मतांची आघाडी घेतली.
सतराव्या फेरीला पुन्हा मनसेने आघाडी घेतली. त्यानंतर, एकोणिसाव्या फेरीत मनसेला तीन हजारांच्या आसपास मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे आता मनसे ही जागा जिंकणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. यामुळे केळकर यांची आघाडी १० हजारांवरून थेट सहा हजारांच्या आसपास घसरली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली होती. त्यानंतर, शहराच्या मध्यवर्ती भागातील मते मोजण्यास सुरुवात झाली आणि तेथून केळकर यांचा विजय निश्चित झाला. यापुढील साडेसात फेºयांमध्ये केळकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. अखेर, केळकर यांना ९२ हजार २९८ मते मिळाली, तर मनसेचे अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मिळाली. केळकर यांनी जाधव यांचा १९ हजार ४२४ मतांनी पराभव केला.
मागील निवडणुकीत केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये २१ हजार ४२७ मतांनी वाढ झाली. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून ८३ हजारांची आघाडी मिळाली होती. त्या तुलनेत विधानसभेत केळकर यांच्या आघाडीत तब्बल ६२ हजार मते कमी झाली. एकूणच केळकर यांचा विजय झाला असला, तरी येत्या काळात मनसेने घेतलेली मते पाहता ही शिवसेना आणि भाजप यांच्याकरिता धोक्याची घंटा मानली जात आहे.
ठाणेकर मतदारांना धन्यवाद देईन. पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती ठाणेकरांनी दिली आहे. भाजप-शिवसेना युतीचा हा विजय आहे. ठाण्याचा विकास करण्याच्या दृष्टीने यापुढेही प्रयत्न करीन. मतांची आघाडी कमी झालेली नाही. मला मागील वेळेच्या तुलनेत २० हजार जास्त मते मिळाली आहेत.
- संजय केळकर, ठाणे मतदारसंघातील विजयी उमेदवार, भाजप
शिवसेना, भाजपच्या बालेकिल्ल्यात आमची ताकद नसतानाही आम्ही तरुण पिढीला सोबत घेऊन लढलो. मतदारांनी जी साथ दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. हार-जित तर होत राहतेच, मात्र लढलो त्याचा अभिमान आहे.
- अविनाश जाधव, ठाणे मतदारसंघातील मनसेचे उमेदवार