ठामपाच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने जून अखेरीस केली ७४.४५ कोटी मालमत्ता कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 01:43 PM2019-06-30T13:43:05+5:302019-06-30T13:49:37+5:30
ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे यंदा जून अखेरपर्यंत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे.
ठाणे - ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे यंदा जून अखेरपर्यंत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे. तर 29 जून या एका दिवसात या विभागाने 12 कोटी 13 लक्ष एवढी वसुली केली आहे. गतवर्षी या विभागातर्फे 51 कोटी रुपये कर वसुली झाली होती.
पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाही रक्कम भरल्यास, दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेवर सूट, सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे.
रोमा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी एक रकमी 12 कोटी ९३ लक्ष इतकी कराची रक्कम जमा केली आहे. आतापर्यंत या विभागातर्फे 34 .45 कोटी इतकी कराची रक्कम वसूल करण्यात आली आहे. एक कोटी व त्यापेक्षा अधिक रकमेच्या करदात्यांस यावेळी पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परिमंडळ ३ अशोक बुरपल्ले, उपायुक्त कर ओमप्रकाश दिवटे उपकर निर्धारक व संकलक जी.जी. गोदापुरे, सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, कर निरीक्षक रमेश दळवी आदींनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
ठाणे महापालिकेच्यावतीने या आर्थिक वर्षात कर निर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये कस्टमाईज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. करदात्यांना आपला कर निर्धारण तपशील पाहणे, डाऊनलोड व कर प्रदान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून करदात्यांना एसएमएसद्वारे कर रक्कम जमा झाल्याची खात्री कर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क कर संकलन सुविधा महापालिकेच्या २० कर संकलन केंद्राबरोबरच मोबाईल व्हॅनद्वारे देखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.