ठाण्यात मलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू
By admin | Published: July 3, 2017 06:26 AM2017-07-03T06:26:10+5:302017-07-03T06:26:10+5:30
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ठाणे महापालिकेने गोखले रोडवरील मलवाहिनीची पाहणी करून काम युद्धपातळीवर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ठाणे महापालिकेने गोखले रोडवरील मलवाहिनीची पाहणी करून काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मलवाहिनीच्या खड्ड्याभोवताली फलक लावून अत्याधुनिक यंत्राद्वारे कामाला सुरुवात केली. ‘गोखले रोडवरील मलवाहिनीचे काम खोळंबले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २० जून रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.
सतत गर्दी असणाऱ्या गोखले रोडवर मागील तीन महिन्यांपासून मलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा महापालिकेच्या बांधकाम विभागाने खोदून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित असताही ते अद्यापही झाले नव्हते. त्यापासून रस्त्यावरील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे संतापलेल्या ठाणेकरांनी काम वेळेत का पूर्ण झाले नाही, यासह विविध मुद्यांना हात घालून ठाणे महापालिकेच्या (टीएमसी) बांधकाम विभागाला धारेवर धरले होते. सातत्याने पाठपुरावा करूनही काम न करणाऱ्या ठाणे महापालिकेने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन तांत्रिक पद्धतीच्या या कामास प्रारंभ केला.
या कामाचे महत्त्व पटवून देणारी इत्थंभूत माहिती नागरिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. कामाच्या वर्कआॅर्डरचा नंबर, किती कालावधीत हे काम पूर्ण होणार, कामाचे नाव, कामाचे स्वरूप, अंदाजे खर्च, कंत्राटदाराचे नाव, कामाच्या सुरुवातीचा दिनांक, या कामास जबाबदार महापालिका अधिकाऱ्याचे, ठेकेदाराचे, कंपनीचे नाव व फोन नंबर, आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी जबाबदार अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक आदी माहिती देणारा फलक महापालिकेने या कामाच्या ठिकाणी लावला आहे.
मलवाहिनीच्या भुयारी पाइपलाइनसाठी रस्त्याच्या मधोमध हा खड्डा तीन महिन्यांपासून केला आहे. त्यात पडून दुर्घटना होऊ नये म्हणून चहूबाजूने पत्र्यांचे कम्पाउंड घातले आहे.