ठाणे मनपाने केली शासनाची दिशाभूल
By admin | Published: March 21, 2016 01:26 AM2016-03-21T01:26:55+5:302016-03-21T01:26:55+5:30
ठाणे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाला त्यांच्या कामाचा एक अहवाल सादर केला
ठाणे : ठाणे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाला त्यांच्या कामाचा एक अहवाल सादर केला. या अहवालात पाच लाख वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात ४५ हजार वृक्ष लावल्याची माहिती जिओ टॅगवर दिल्याचा उल्लेख आहे. परंतु, शहरात प्रत्यक्षात तेवढे वृक्ष लावलेच नसल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांंनी केला. तसेच प्रशासनानेदेखील जिओ टॅगवर केवळ २१ हजार वृक्षांची माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त सदस्यांनी शासनाला चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करून प्रशासनाला धारेवर धरले.
जिओ टॅगच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यात शासनाला सादर केलेल्या अहवालाचा आधार घेऊन शहरात एवढी वृक्षलागवड झाली नसल्याचा आरोप पवार यांनी केला. त्याची माहिती तत्काळ सभागृहाला मिळावी, असा आग्रह धरला. त्यानुसार, प्रशासनाच्या वतीने उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहरात सुमारे ४५ हजार वृक्षांची लागवड केली असून २१ हजार वृक्ष जिओ टॅगवर घेतल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाच्या या उत्तरामुळे सदस्य आणखी आक्रमक झाले. जिओ टॅगवर जर २१ हजार वृक्षांचा उल्लेख आहे, तर मग शासनाला दिलेल्या अहवालात ४५ हजार असा उल्लेख का केला, असा सवाल केला. दुसरीकडे शीळच्या डोंगरावर ३२ हजार वृक्षलागवडीचा दावा प्रशासनाने करताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील यांनी एवढे वृक्ष असतील, तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असा इशारा दिला.