ठाणे मनपाने केली सर्वाधिक वसूली
By admin | Published: May 5, 2017 05:42 AM2017-05-05T05:42:36+5:302017-05-05T05:42:36+5:30
मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा ठाणे महापालिकेने विविध करांतून तब्बल २०५० कोटींची विक्रमी वसुली केली असून ती राज्यातील
ठाणे : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा ठाणे महापालिकेने विविध करांतून तब्बल २०५० कोटींची विक्रमी वसुली केली असून ती राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत अव्वल आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तो स्वीकारला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राज्य शासनाच्या नगर विकास विभाग आणि नगर प्रशासन विभागाच्या वतीने या वर्षीपासून आयोजित करण्यात आलेल्या नगर विकास दिनाच्या भव्य कार्यक्र मामध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. या वेळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या समारंभात सर्वाधिक वसुलीसाठी ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिकेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांत ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये उल्लेखनीय अशी भर पडली आहे. विशेषत: जयस्वाल यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी वसुली आणि उत्पन्नवाढीसाठी कठोर मेहनत घेतली. त्यामुळेच २०१३-१४ च्या ११५४.३७ कोटींच्या तुलनेत सन २०१४-१५ मध्ये महापालिकेचे उत्पन्न १३७६.६ कोटींवर गेले, म्हणजेच तब्बल २२२ कोटी रुपयांनी वाढले. २०१५-१६ मध्ये महापालिकेचे उत्पन्न १३७६.६ कोटींवरून १७८८.५१ कोटींवर पोहोचले.
या वर्षात महापालिकेच्या उत्पन्नामध्ये ४१२ कोटी रुपयांची विक्र मी वाढ झाली, तर २०१६-१७ मध्ये महापालिकेचे उत्पन्न २०५०.०९ कोटींवर पोहोचले. या वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात २६१ कोटी इतकी वाढ झाली. (प्रतिनिधी)