ठाणे मनपात ई - लर्निंगचे धडे
By admin | Published: October 16, 2015 01:40 AM2015-10-16T01:40:33+5:302015-10-16T01:40:33+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या दोन शाळांमध्ये ई-लर्निंगचे क्लास गुरुवारी सुरू करण्यात आले.
ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या दोन शाळांमध्ये ई-लर्निंगचे क्लास गुरुवारी सुरू करण्यात आले. त्यामुळे आता या मुलांच्या पाठीवरील ओझे यानिमित्ताने कमी होणार आहे. येत्या १५ दिवसांमध्ये दप्तरविरहित वर्ग सुरू करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयत्न असून पुढील सहा महिन्यांत महापालिकेच्या सर्वच शाळा ई-लर्निंगच्या छताखाली आणण्याचा मानस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यातील शाळादेखील स्मार्ट करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून महापालिकेच्या २४ शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरु वारी पालिकेच्या किसननगर नं. १ आणि मुंब्रा येथील शाळा क्र मांक १० या दोन शाळांमध्ये त्याचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते झाला. (प्रतिनिधी)