Thane: मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने जिंकला वेंगसरकर चषक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:44 IST2025-02-22T17:44:17+5:302025-02-22T17:44:49+5:30
Vengsarkar Cup News: ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर ट्राॅफीवर मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने आपले नाव कोरले आहे.मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब आणि काॅम्रेड्स क्रिकेट अकादमी यांच्यात झालेला हा अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता.

Thane: मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने जिंकला वेंगसरकर चषक
ठाणे - ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर ट्राॅफीवर मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने आपले नाव कोरले आहे.मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब आणि काॅम्रेड्स क्रिकेट अकादमी यांच्यात झालेला हा अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा कळव्यातील अनिरुद्ध क्रिकेट अकादमीचा कनिष दळवी हा बेस्ट बॅट्समन ठरला आहे.
माहुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकरावर्षाखालील क्रिकेटपटूंच्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासूनच मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने आपले वर्चस्व राखले होते. काल ओव्हल मैदान, मुंबई येथे मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब आणि काॅम्रेड्स क्रिकेट अकादमी यांच्यात अंतिम सामना झाला. प्रशिक्षक दर्शन भोईर, अजय यादव आणि विरेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरलेल्या मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना युवान जैन याच्या 41 धावांच्या पाठबळावर 35 षटकांत सात बाद 141 धावांची मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना काॅम्रेड्स क्रिकेट अकादमीनेही चांगली सुरूवात केली होती. मात्र, मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर काॅम्रेड्स क्रिकेट अकादमीला 139 धावांवर रोखण्यात यश मिळविले. शेवटच्या षटकात दहावा गडी बाद करून मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने चषकावर आपले नाव कोरले.
दरम्यान, कळव्यातील अनिरुद्ध क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेणारा कळवेकर कनिष दळवी याला संपूर्ण मालिकेत जोरदार फलंदाजी करीत चार सामन्यांमध्ये 270 धावांची धुवाँधार फलंदाजी केल्याने या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तर 41 धावांसह एक बळी घेणाऱ्या युवान जैन याला सामनावीर किताबाने गौरविण्यात आले. बेस्ट बाॅलर म्हणून युग सोलंकी आणि मालिकावीर म्हणून शौर्य दुसी याला गौरविण्यात आले.