ठाणे, मावळच्या खासदारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:25 PM2019-05-22T23:25:39+5:302019-05-22T23:26:27+5:30

मतदारराजाचा फायनल कौल कळणार। सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष

Thane, Mawal MPs decide today | ठाणे, मावळच्या खासदारांचा आज फैसला

ठाणे, मावळच्या खासदारांचा आज फैसला

Next

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आता मतदारांचा कौल आज (गुरुवारी) स्पष्ट होणार आहे. ठाणे कुणाच्या वाट्याला जाणार, याकडे मतदारांच्या नजरा खिळल्या आहेत.


मागील महिन्यात २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघात ४९.२३ टक्के मतदान झाले होते. ठाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात झालेल्या लढतीनंतर निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या क्षणी ‘काँटे की टक्कर’ ठरली होती. त्यामुळे ठाण्याचा खासदार कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे.
मताधिक्याने कोण जिंकणार
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, भाजप-शिवसेना युतीचे खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे आनंद परांजपे यांच्यात लढत आहे. निकालाच्या दिवशी कोणाच्या पारड्यात विजयाचे दान पडते, कोण किती मताधिक्याने जिंकतो, हे स्पष्ट होईल.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात सकाळी आठपासून मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे. मतपेटीत बंद झालेल्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.


मावळमध्ये या वेळी यंदा ५९.४९ टक्के मतदान झाले. क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमधील स्ट्राँगरूममध्ये मतपेट्या सील करण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार
आहे. बुधवारी मतमोजणीचा आढावा घेण्यात आला आहे.

फेरीनिहाय होणार निकाल
मतमोजणीचे संपूर्ण व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार
आहे. एकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.



या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
राजन विचारे। शिवसेना : शिवसेनेकडून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत असून त्यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मागील निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आलेल्या; परंतु पाच वर्षांत मतदारांची नाराजी पत्करलेल्या विचारे यांच्या उमेदवारीबाबत पक्षातूनच नाराजी होती. अशा परिस्थितीतसुद्धा या निवडणुकीत काँटे की टक्कर झाल्याने त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

आनंद परांजपे। राष्ट्रवादी : राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परांजपे हे २00८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर येथून निवडून आले होते. त्यानंतर २00९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून निवडून आले होते. प्रथमच राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते निवडणूक लढवित असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, ठाणे, मीरा-भार्इंदर, ओवळा माजिवडा व कोपरी पाचपाखडी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात या वेळी मतदारसंख्या २३ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी ११ लाख ८३ हजार मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात सरासरी ४९.२३ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.

पार्थ पवार। राष्ट्रवादी : राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना निवडणुकीच्या मैदान उतरविले आहे. पार्थ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यानुसार पवार कुटुंबीयांनी प्रचारासाठी संपूर्ण मावळ मतदारसंघ पिंजून काढला होता. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाच्या निकालाकाडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


श्रीरंग बारणे। शिवसेना : मावळ मतदार संघातून शिवसेनेच श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असलेल्या या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील तीन तर रायगडमधील तीन विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. मावळची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची बनविल्याने याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ मतदारसंघात पनवेल, उरणसह कर्जत, पिंपरी, चिंचवड आणि मावळ या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण २२ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यापैकी १३ लाख ९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी सरासरी ५९.४५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 

Web Title: Thane, Mawal MPs decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.