ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भाजप आणि मनसेची मागणी, स्पर्धेचा निधी पुरग्रस्तांसाठी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 03:48 PM2019-08-13T15:48:44+5:302019-08-13T15:53:25+5:30
यंदाच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या स्पर्धेवर केला जाणारा खर्च पुरग्रस्तांसाठी देण्याची मागणी भाजप आणि मनसेने केली आहे. परंतु या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याने ती रद्द करता येऊ शकत नसल्याचे सत्ताधारी शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
ठाणे - महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना दरवर्षी होणारी ठाणेमहापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रद्द करावी अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे केली आहे. तर मनसेनेसुध्दा हीच मागणी केली असून मॅरेथॉनचा निधी पुरग्रस्तांच्या कल्याणासाठी देण्याची मागणी केली आहे.
येत्या १८ आॅगस्ट रोजी ३० ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी खड्डे, प्रयोजकांकडून मिळणाऱ्या रकमेची उधळपट्टी, भर रस्त्यात टाकले जाणारे व्यासपीठ आदींमुळे चर्चेत राहणारी मॅरेथॉन स्पर्धा यंदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने ४० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. इतर खर्च हा प्रयोजकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार या स्पर्धेसाठी एकूण ७० ते ७५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. परंतु या स्पर्धेवर होणारा हा खर्च पाहता ही रक्कम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर व कोकण आदी ठिकाणी पुरिस्थतीचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी देण्याची मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. एकीकडे पुरस्थिती असतांना दुसरीकडे ही स्पर्धा घेतली तर त्यामुळे महापालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होईल असेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सुध्दा या संदर्भात एक पत्र दिले असून ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी शहरातील खड्ड्यांची घाई गडबडीत डागडुजी सुरु आहे. पुन्हा तोंडावर असलेल्या गणेशोत्सवात खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा होण्याची शक्यता असल्याने मॅरेथॉन रद्द केल्यास प्रशासनाला खड्डे बुजवण्यास योग्य कालावधी मिळेल, असेही पाचंगे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.