नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी ठाण्यात 'महापौर जनसंवाद'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:49 PM2020-01-16T12:49:45+5:302020-01-16T12:54:03+5:30
नरेश म्हस्के यांच्या अभिनव संकल्पनेतून जानेवारी 2020 पासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महापौर जनसंवाद हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
ठाणे - नागरिकांना थेट महापौर व प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून नागरी कामांच्या समस्या मांडता याव्यात. त्यांचे निराकरण तातडीने करुन सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा निपटारा तत्परतेने व्हावा किंवा त्यांना न्यायहक्क मिळावा महापौर नरेश म्हस्के यांच्या अभिनव संकल्पनेतून जानेवारी 2020 पासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महापौर जनसंवाद हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (20 जानेवारी) पहिला 'महापौर जनसंवाद' सकाळी 11.00 वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित केला आहे.
बहुतांश वेळा सर्वसामान्य नागरिकांना वरिष्ठ् अधिकारी यांची भेट घेणे शक्य नसते किंवा आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता येत नसल्यामुळे अगदी लहान कामे सुध्दा दिवसेंदिवस प्रलंबित राहतात. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कामाविषयी नेहमीच अविश्वास वाटतो. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरी कामांविषयी असलेल्या समस्या तातडीने सोडविता याव्यात यासाठी महापौरांच्या अभिनव संकल्पनेतून महापौर जनसंवाद हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या जनसंवादादरम्यान महापालिकेचे पदाधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहून नागरी कामाविषयी नागरिकांना असलेल्या तक्रारी ऐकतील व त्यांचे निराकरण करतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल व त्यांना या माध्यमातून खुले व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविला जाणार असून एखाद्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास हा उपक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी राबविला जाईल, जेणेकरुन यात खंड पडणार नाही असेही महापौर यांनी नमूद केले. नागरिकांनी महापौर जनसंवाद या कार्यक्रमास येताना आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणावे असे आवाहन महापौर व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....
काय सांगता? महिन्याला फक्त 6 हजार पगार, आयकर विभागाने पाठवली तब्बल 3.49 कोटींची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन
लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी