ठाणे महापौर मॅरेथॉन शिवसेना करणार हायजॅक
By admin | Published: July 26, 2016 04:50 AM2016-07-26T04:50:09+5:302016-07-26T04:50:09+5:30
ठाणे पालिकेची निवडणूक लक्षात शिवसेनेने यंदाची महापौर चषक मॅरेथॉन पूर्णत: हायजॅक करण्याची योजना आखली आहे. या स्पर्धेपासून मित्रपक्ष भाजपा कसा दूर राहील, याची दक्षताही सेना
ठाणे : ठाणे पालिकेची निवडणूक लक्षात शिवसेनेने यंदाची महापौर चषक मॅरेथॉन पूर्णत: हायजॅक करण्याची योजना आखली आहे. या स्पर्धेपासून मित्रपक्ष भाजपा कसा दूर राहील, याची दक्षताही सेना नेत्यांनी घेतली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याच उपस्थितीत अप्रत्यक्षपणे ताकद दाखवण्याची योजना पक्षाने आखली आहे.
ठाण्यात शिवसेनेचे महापौर असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मॅरेथॉनमध्ये नवे फंडे अजमावले जाणार आहेत. जास्त गर्दी खेचून मॅरेथॉनचे श्रेय स्वत:कडे लाटण्यासाठी सेलिब्रेटीजचा आधार घेतला जाणार आहे. स्पर्धेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार असल्याचे महापौर संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड ब्रेक केलेल्या सैराट चित्रपटाची टीमसह टीव्हीवर गाजत असलेली कॉमेडी मालिका चला हवा येऊ द्या या मालिकेच्या टीमलादेखील बोलविले जाणार आहे.
या स्पर्धेचा मार्ग देखील शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या विभागातून जास्तीतजास्त नेण्यात येणार असून त्या त्या ठिकाणच्या शाखाप्रमुखांसह विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच कामाला लावले जाणार आहे.