ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये २० हजार स्पर्धक, २ सप्टेंबरला रंगणार थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:12 AM2018-08-14T03:12:14+5:302018-08-14T03:12:34+5:30
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे - २९ वी ठाणेमहापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी सात लाख दोन हजारांची बक्षिसे ठेवली आहेत.
महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून ११ गटांत ती घेण्यात येणार आहे. पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरावर असून पुरुष २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रु . ७५ हजार, द्वितीय ४५ हजार आणि तृतीय ३० हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी १५ हजारांचे पारितोषिक असणार आहे. त्याशिवाय ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
महिलांसाठीची स्पर्धा १५ किमीची असणार असून यामध्ये प्रथम पारितोषिक ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजार आणि चौथे १५ हजार अशी असून ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या ठिकाणी समाप्त होणार आहेत.
१८ वर्षांवरील मुले (खुला गट) ही १० किमी असणार असून ही स्पर्धा पारसिकनगर ९० फूट रोड, खारेगाव येथून सुरू होणार असून महापालिका भवन चौक येथे समाप्त होणार आहेत. चौथा गट १८ वर्षांखालील मुले १० किमी ही जिल्हास्तरीय स्पर्धा असून ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटो शोरूम, वागळे इस्टेट येथे समाप्त होणार आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या सर्व स्पर्धांची सुरुवात महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी पाच किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक, उथळसर येथे समाप्त होणार आहे. १२ वर्षांखालील मुलामुलींसाठी तीन किमीची स्पर्धा असून ही स्पर्धा महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण २३८ पंच, ९२ पायलट, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षारक्षक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेदरम्यान स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय मॅरेथॉन स्पर्धकांसाठी ठाणे परिवहनसेवेतर्फे मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी सदर जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक महिला व
पुरुष वेगळा गट
ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अशी अर्धा किमीची ही स्पर्धा असणार आहे.
अवयवदानासाठी जनजागृती
यंदाही ही दोन किमीची जिल्हास्तरीय ‘रन फॉर फ्री प्लास्टिक ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून येथेच समाप्त होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ज्युपिटर
रु ग्णालयाचे डॉक्टरही सहभागी होणार
आहेत.