ठाण्यात मेट्रो करणार २८ किलोमीटरचा प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:58 AM2018-03-29T00:58:22+5:302018-03-29T00:58:22+5:30
शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोचा अंतिम आराखडा पुढील महिन्यात येणार असला, तरी त्याचा प्रारूप आराखडा मात्र तयार झाला आहे.
ठाणे : शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोचा अंतिम आराखडा पुढील महिन्यात येणार असला, तरी त्याचा प्रारूप आराखडा मात्र तयार झाला आहे. त्यानुसार, ही मेट्रो नवीन स्टेशनमार्गे घोडबंदरमार्गे साकेतवरून ठाणे स्टेशनकडे २८ किमीवरून धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, या भागातील बांधकामे कमीतकमी कशी बाधित होतील, याचा आता अभ्यास केला जात असून काही ठिकाणी उन्नतमार्गे, तर काही ठिकाणी भूमिगत अशा स्वरूपात ती धावण्याची शक्यता असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वे स्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यासह संपूर्ण शहरास फायदेशीर ठरेल, अशी मार्गिका निश्चित केली असून पीआरटीएस मार्गिकाही याअंतर्गत मार्गिकेशी संलग्नित करण्यात येणार आहे. या मार्गिकेच्या आराखड्यामध्ये किरकोळ बदल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार, ते केले असून त्याचा प्रारूप आराखडाही तयार झाला आहे.
केंद्राच्या मंजुरीनंतर निविदा
या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर हा प्रकल्प आराखडा केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्प अंमलबजावणी बोर्ड (पीआयबी) मंडळाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार, अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ठाणेकरांना याअंतर्गत मेट्रोचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प लाइट रेल ट्रान्झिट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. मेट्रोमुळे वाहतूककोंडी कमी करण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अशी धावणार मेट्रो
या मेट्रोची व्यवहार्यता अद्याप प्राप्त झाली नसली तरी ती शहरातून कशी व कोणत्या पद्धतीने धावेल. कुठे रेल्वे, बस स्टेशन, पीआरटीएस आदींनी कनेक्ट होऊ शकते, याचा अभ्यास मात्र पूर्ण झाला असून त्यानुसार तिची स्थानके निश्चित झाली आहेत.
शहरातील २८ किमीचा हा मार्ग असणार असून ठाणे स्टेशनपासून ही मेट्रो बाहेर पडणार आहे. पुढे नवीन रेल्वे स्टेशन ते मॉडेला, रोड नं. २२, लोकमान्यनगर बसस्थानक, पोखरण १, देवदयानगर, पोखरण ३, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहमार्गे पुढे पातलीपाडा, कासारवडवली येथे जाणार आहे.
येथून ही मेट्रो यू टर्न घेणार असून हिरानंदानी इस्टेटच्या मागील बाजूने पुढे ब्रह्मांड, आझादनगर, बाळकुम, साकेतमार्गे पुढे ठाणे स्टेशनला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
6500हेक्टर जमिनीवर अतिक्रमण
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट) चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंगरूट पद्धतीने या मार्गावरून प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रूट्ससाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमिनीवर अतिक्र मण आहे. शिवाय, काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. परंतु, मार्ग निश्चित झाल्याने प्रवासासाठी नक्की कोणते साधन योग्य ठरणार, याचा निर्णय झाल्यानंतर या मार्गावर काम करणे महापालिकेला शक्य होणार आहे. त्यानुसार, आता अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे.