ठाण्यात मनसे-शिवसेना साथ-साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:19 AM2018-04-12T03:19:57+5:302018-04-12T03:19:57+5:30
वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स कंपनीजवळील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी करण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास त्यांचे पक्षातील सहकारी नरेश म्हस्के यांनी विरोध केलेला असतानाच बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्याविरोधात अंत्ययात्रा काढून आपला निषेध केला.
ठाणे : वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स कंपनीजवळील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी करण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास त्यांचे पक्षातील सहकारी नरेश म्हस्के यांनी विरोध केलेला असतानाच बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्याविरोधात अंत्ययात्रा काढून आपला निषेध केला. शिवाईनगरपासून रामबाग स्मशानभूमीपर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे अंत्ययात्रेमध्ये शिवसेना पदाधिकारीदेखील सामील झाले होते. त्यामुळे स्मशानभूमीवरून आता शिवसेनेचा एक गट मनसेसोबत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
>वादामुळे नुकसान
सेनेच्या दोन गटांमधील वादामुळे लोकांचे नुकसान होत आहे. लोकवस्तीपासून ३० मीटरपर्यंत स्मशानभूमी असावी, असा नियम असताना वैयक्तिक हट्टापायी आ. प्रताप सरनाईक यांनी मोर्चा काढला होता. त्यात सेना नगरसेवकासह पदाधिकारी नव्हते. तसेच वर्तकनगरमधील स्थानिकदेखील सहभागी नव्हते, असा आरोप मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. यावेळी उपशहराध्यक्ष पुष्कर विचारे, तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक कुलकर्णी, उपविभागप्रमुख श्रीपाद पांगे, रोहिणी जुवळे उपस्थित होते.