एकनाथ शिंदेंकडेच ठाण्याचे पैसे, नारायण राणेंची सरकारविरोधात बॅटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 09:57 PM2021-02-16T21:57:00+5:302021-02-16T22:05:21+5:30
ठाण्यात केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी राणे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टिकास्त्र सोडले.
ठाणे : आम्ही राज्य सरकाराला निधी दिला आहे, राज्य सरकाराने आधी ठाण्याचे पैसे द्यावेत मग आमच्याकडे निधीची अपेक्षा करावी. परंतु ठाण्याचे पैसे हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्याची टिका भाजपचे खासदार नारायण राणो यांनी केली आहे. त्यांच्याकडे युडीचे खाते आहे, त्यांनी पैसे दिले तर ठाण्याचा विकास होईल असाही टोला त्यांनी लगावला.
ठाण्यात केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी राणे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टिकास्त्र सोडले. महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राणे यांना छेडले असता, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवित त्यांच्याकडे युडीचे खाते आहेत, त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडेच असल्याचा टोला लगावला. ५०० चौरस फुटांच्या घरांना अद्याप करमाफी दिलेली नाही. आधी वचने देतात, आणि त्यांना पाने पुसन्याचे काम ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे खोटारडेपणाचे सत्ताधारी आहेत. परंतु वचने पूर्ण करण्याची धमकसुध्दा लागते ती ठाण्यातील शिवसेनेत नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
ठाण्यात अनाधिकृत बांधकामे वाढत आहेत, परंतु त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जात आहे. चुक करणा:या अधिकाऱ्यावर कारवाई होणो अपेक्षित असतांना येथे त्या बांधकामांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर इथे गुन्हे दाखल केले जातात. याचाच अर्थ ठाण्यात पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेची मिलजुली सरकार आहे. पालिकेचे अधिकारी येथे तक्रारदाराला धमक्या देतात मात्र अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणो महापालिकेत भ्रष्टाचार वाढलेला आहे, त्यामुळे ठाण्याची जनता बेजार झालेली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या या भ्रष्टाचाराचा बुरखा आम्ही फाडणार असून आगामी ठाणो महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी कमकुवत आहेत, त्यामुळेच अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, किंबहुना चुकीच्या कामात याच अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याने अधिकारी देखील फोफावले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.