सर्वाधिक गर्दीचे शहर बनत आहे अपघातांचे ‘ठाणे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:24 PM2018-10-26T23:24:28+5:302018-10-26T23:24:39+5:30
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर पायाभूत सोईसुविधांच्या अभावामुळे, तर काही ठिकाणी प्रवाशांच्या आततायीपणामुळे रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.
मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर पायाभूत सोईसुविधांच्या अभावामुळे, तर काही ठिकाणी प्रवाशांच्या आततायीपणामुळे रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले आहेत. मुंबई रेल्वेमध्ये ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक १५४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे.
मध्य रेल्वेने नुकतेच ठाणे स्थानकात सर्वाधिक प्रवासी वर्दळ असल्याने, सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे स्थानकाची घोषणा केली होती. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार (सप्टेंबर २०१८), ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना १५४ अपघात झाले आहेत. यात १२९ पुरुषांचा तर २५ महिलांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत अर्थात, २०१६ आणि २०१७ मध्ये अनुक्रमे २४४ आणि २२३ अपघातांसह पहिल्या क्रमांकावर असलेले कल्याण स्थानक या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहे. कल्याण स्थानकात यंदा १५१ जणांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. यात १३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा-कर्जत आणि चर्चगेट ते पालघर या मार्गादरम्यान मध्य आणि पश्चिम परिमंडळ मिळून एकूण १७ पोलीस स्टेशन येतात. गेल्या तीन वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेचा आढावा घेतला असता, मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू होण्याच्या संख्येत घट होत असल्याचे स्पष्ट होते. यंदा मध्य रेल्वेवर एकूण ७७७ अपघाती मृत्यू, पश्चिम रेल्वेवर ४३५ अपघाती मृत्यू झाले आहेत.
>यंदा रेल्वे रूळ ओलांडताना होणाºया अपघातांमध्ये घट
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मार्च १९ अखेर ३६ किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकात उद्घोषणा करण्यात येतात. रेल्वे सुरक्षा बलाकडून विशेष मोहीम ही राबविण्यात येतात. जनजागृती अभियान, आरपीएफची कामगिरी, यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात अपघातांच्या संख्येत घट होत आहे. प्रत्येक प्रवाशांनी स्वत: च्या जीवनाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जीवन मौल्यवान असून, प्रवाशांनी या बाबत जागरूक राहून रेल्वे रूळ ओलांडू नये.
- डी. के. शर्मा,
महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.
>पश्चिम रेल्वे ‘सरस’
पश्चिम रेल्वे मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकात सर्वाधिक कमी म्हणजेच अवघ्या १२ प्रवासी अपघातांची नोंद झाली आहे. परिणामी, वक्तशीरपणासह प्रवासी सुरक्षिततेमध्येदेखील पश्चिम रेल्वे अव्वल ठरत असल्याचे स्पष्ट होते.