Thane: सुनेचा खून करणाऱ्या सासूला जन्मठेप; पतीची निर्दोष मुक्तता ठाणे न्यायालयाचा निकाल
By जितेंद्र कालेकर | Updated: December 18, 2024 22:58 IST2024-12-18T22:57:40+5:302024-12-18T22:58:01+5:30
Thane Crime News: सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर तिच्या आत्महत्येचा बनाव करून पेटवून देत तिचा खून करणाऱ्या जमनाबेन मंगे (७६, रा. रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या सासूला ठाणे न्यायालयाने जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे.

Thane: सुनेचा खून करणाऱ्या सासूला जन्मठेप; पतीची निर्दोष मुक्तता ठाणे न्यायालयाचा निकाल
- जितेंद्र कालेकर
ठाणे - सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर तिच्या आत्महत्येचा बनाव करून पेटवून देत तिचा खून करणाऱ्या जमनाबेन मंगे (७६, रा. रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या सासूला ठाणे न्यायालयाने जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. याच आरोपातून पतीची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
यातील आरोपी सासू जमनाबेन आणि पती अशोक मंगे (४०) यांनी दक्षा मंगे (३०) या विवाहितेला लग्न झाल्यापासून क्षुल्लक कारणांवरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. यातूनच त्यांनी तिला घराबाहेर काढल्याने ती माहेरी वास्तव्याला होती. घटनेच्या दिवशी १४ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ती मुलीच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे घेण्यासाठी तिच्या सासरी गेली होती. त्यावेळी सासू जमनाबेनने तिचा हात धरून तिला खेचत स्वयंपाक घरात आणले. त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तिच्या दहा वर्षांच्या मुलीच्या समोरच घडला. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तिला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात सासू जमनाबेन आणि पती अशोक या दोघांविरूद्ध ४९८ - अ तसेच ३०२ खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दोघांनाही १४ एप्रिल २०१८ रोजी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात १८ डिसेंबर २०२४ रोजी झाली. दहा वर्षांच्या मुलीची साक्ष, दक्षा हिचा मृत्यूपूर्व जबाब तसेच तिचा जबाब नोंदविण्याच्या वेळी असलेल्या डॉक्टरांसह सात साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आरोपींना शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून ७१व्या वर्षीही असे क्रूर कृत्य करणाऱ्या या सासूला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सढळ पुराव्यांअभावी पती अशोक याची निर्दोष मुक्तता केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, निरीक्षक एस. व्ही. देशपांडे, पैरवी अधिकारी अमोद सडेकर, हवालदार साबळे आणि गावित यांनी या खटल्यासाठी विशेष कामगिरी केली.