शतकी नाट्यसंमेलनासाठी ठाण्याच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:19 AM2018-08-01T00:19:11+5:302018-08-01T00:19:19+5:30

शहरात ९६ वे. अ.भा. मराठी नाट्यसंमेलन यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता १०० वे अ. भा. मराठी नाट्य संमेलनही ठाणे शहरात करण्याची तयारी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने दाखविली आहे.

Thane movement for the centenary of the century has started | शतकी नाट्यसंमेलनासाठी ठाण्याच्या हालचाली सुरू

शतकी नाट्यसंमेलनासाठी ठाण्याच्या हालचाली सुरू

Next

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : शहरात ९६ वे. अ.भा. मराठी नाट्यसंमेलन यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता १०० वे अ. भा. मराठी नाट्य संमेलनही ठाणे शहरात करण्याची तयारी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने दाखविली आहे. या संमेलनाची इतिहासात नोंद व्हावी, ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा, यासाठी हे संमेलन ठाण्यात होण्यासाठी नाट्य परिषदेची ठाणे शाखा प्रयत्नशील आहे. या मागणीचे पत्र त्यांनी अ. भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेकडे दिले आहे.
२०१६ साली ठाणे शहरात ९६ वे. अ. भा. मराठी नाट्यसंमेलन मोठ्या थाटामाटात पार पडले. शहरातील हे पहिले नाट्यसंमेलन होते. या संमेलनाप्रमाणे या शहरात १९६८, १९८७ आणि २०१० साली साहित्य संमेलनही पार पडले आहे. त्याचप्रमाणे या शहराने विविध संमेलनेही ठाणेकरांना दिली आहेत. त्यात ३१ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, आठवे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, २९ वे अ.भा. सावरकर साहित्य संमेलन, बहुभाषिक साहित्य संमेलन, पहिले सीकेपी साहित्य संमेलन, शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथसंग्रहालयांचे संमेलन, व्यंगचित्रकार संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनांचा समावेश आहे. ९६ वे. अ. भा. मराठी नाट्य संमेलनानंतर ९७ वे संमेलन हे उस्मानाबाद तर ९८ वे संमेलन हे मुलुंड येथे पार पडले. ९९ वे संमेलन झाल्यानंतर १०० वे संमेलन हे ठाणे शहरात व्हावे, अशी इच्छा ठाणे शाखेने व्यक्त केली आहे.
जर संमेलन झाले तर ते ठाणे शहराचे भूषण ठरावे आणि १०० वे संमेलन येथे करण्याचा मान ठाणे शहराला मिळावा यासाठी ही मागणी केल्याचे ठाणेकर यांनी लोकमतला सांगितले. ९६ वे नाट्यसंमेलन पार पडल्यावर ठाणे शाखेला आयोजनाचा अनुभव आहे आणि चांगली टीमही आहे. तसेच, आम्ही संमेलन चांगले केल्याचे दाखवून दिले आहे. १०० व्या नाट्यसंमेलनाची मागणी केल्याचे समजल्यावर या संमेलनासाठी अनेक जण पुढे आल्याचेही ते म्हणाले.

बैठकीत मांडला मुद्दा
मुलुंड येथे पार पडलेल्या संमेलनात नाट्य परिषदेच्या सर्व शाखाप्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. त्यात कार्यवाह नरेंद्र बेडेकर यांनी १०० वे संमेलन आम्ही ठाण्यात करायला तयार आहोत, असे सांगितले. शनिवारी पार पडलेल्या नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या बैठकीत कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी हा मुद्दा सर्वांसमोर मांडला आणि रविवारी मध्यवर्ती शाखेला तशा आशयाचे पत्रही दिले.

Web Title: Thane movement for the centenary of the century has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे