राजेशाही थाट! ठाणे महापालिका आयुक्तांचा स्विमिंग पूल तब्बल 2 कोटींचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:52 AM2021-06-03T09:52:42+5:302021-06-03T09:53:06+5:30
विजय सिंघल यांनी निर्णय घेतल्याचा विपीन शर्मा यांचा दावा
ठाणे : कोरोनामुळे ठाण्यातील टॉवरमधील स्विमिंग पूल बंद ठेवलेले असताना ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करून स्विमिंग पूल बांधला आहे. सर्वसामान्य कोरोनामुळे टाचा घासून मरत असताना आयुक्तांकरिता हा राजेशाही थाट कशाला हवा, असा सवाल केला जात आहे. नूतनीकरणाकरिता केवळ ५० लाख रुपयांची निविदा मागवल्याचे भासवले गेले. प्रत्यक्षात हा खर्च ‘वाढता वाढता वाढे’ यानुसार दोन कोटींवर गेला. विद्यमान आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या खर्चाबाबत कानावर हात ठेवले असून, विजय सिंघल हे अल्पावधीकरिता आयुक्त असताना त्यांनी नूतनीकरणाचा हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.
महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांवर आणि महापालिकेच्या उधळपट्टीवर टीका झाली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी यावरून आयुक्तांवर टीकास्त्र सोडले. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची अलीकडेच पाचंगे यांनी भेट घेतली. त्यावेळी नूतनीकरणाचा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला नसून, माझ्या आधीच्या आयुक्तांच्या म्हणजे विजय सिंघल यांच्या काळात झाला असून, त्याची माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, शर्मा यांना हा निर्णय स्थगित करता आला असता, असे ठाण्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दीर्घ रजेनंतर पदभार सोडल्याने, ऐन कोरोनाकाळात नवीन आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्वीकारला. तेव्हा, पालिकेतील प्रशासकीय साखळीने पातली पाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल ५० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करून आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीचा घाट घातला होता. तेव्हाही या उधळपट्टीवरून वादंग उठले होते. मात्र, बंगल्याचे काम पूर्ण होण्याआधीच अवघ्या अडीच-तीन महिन्यांत सिंघल यांची बदली झाली. त्यानंतर जून २०२० अखेरीस ठामपा आयुक्तपदी डॉ. विपीन शर्मा विराजमान झाले. डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ठाण्यात कोरोनाचा कहर सुरू होता. त्यामुळे आयुक्तांच्या सुस्थितीत असलेल्या बंगल्याच्या नूतनीकरणाचा निर्णय जयस्वाल यांच्या कार्यकाळात झाला व सिंघल यांनी कार्यभार घेताच नूतनीकरणाची अंमलबजावणी सुरू केली का, असा सवाल उपस्थित होतो.
सिंघल यांच्या चौकशीची मागणी
कोरोनाचा प्रकोप सुरू असताना सिंघल यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता नूतनीकरणाचा प्रस्ताव रेटला असेल, तर सिंघल यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी चौकशी केली पाहिजे, असे सर्वसामान्य ठाणेकरांचे मत आहे.
एकीकडे कोरोना उपाययोजनांसाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन व नगरसेवक निधी दिला असताना आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणाकरिता कोट्यवधींचा खर्च कशाला हवा, असा सवाल संदीप पाचंगे यांनी केला. आयुक्तपदावरील व्यक्ती त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ मिळत नाही, असे सांगतात. मग आयुक्त पोहतात कधी, असा सवाल केला जात आहे.