ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण; अतिक्रमण काढताना बाप-लेकाने दिली धमकी
By जितेंद्र कालेकर | Updated: January 3, 2025 20:37 IST2025-01-03T20:34:30+5:302025-01-03T20:37:19+5:30
ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण केल्याच्या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण; अतिक्रमण काढताना बाप-लेकाने दिली धमकी
ठाणे : कल्याण फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना पाठीमागून आलेल्या बाप-लेकाने सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. शाहआलम शहाजहॉ खान (६३) आणि अब्दुल खान (२७) असे या बाप-लेकाचे नाव आहे. घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार घेतल्यानंतर या भागातील बेकायदा बांधकामे तसेच फेरीवाले यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यानुसार २ जानेवारी रोजी दुपारी घुगे हे त्यांच्या पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करीत होते.
कारवाईनंतर पुन्हा केले होते अतिक्रमण
यापूर्वी त्याच भागातील खान यांच्या पत्र्याची शेड असलेल्या दुकानावर कारवाई केलेली असताना पुन्हा ती शेड उभारणाऱ्या खान पिता-पुत्रही ताडपत्रीच्या शेडचे उभारून अतिक्रमण करीत इंजिन ऑइलची विक्री करीत असल्याचे आढळले.
सहायक आयुक्तांना दिली धमकी
याच अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी घुगे गेले असता, अब्दुल्लाने घुगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करीत त्यांना धमकी दिली. तर त्यांचे वडील शहाजहॉ यांनी घुगे यांच्या मानेवर हाताने जोराचा फटका मारून शिवीगाळ करीत धमकी दिली. या घटनेप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे पलिकेच्या माजिवडा प्रभाग समितीच्या तत्कालीन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना हाताची बोटे गमवावी लागल्याची वेळ ओढवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सहायक आयुक्त घुगे यांच्यावर अतिक्रमणावर कारवाईदरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
भ्याड हल्ल्याचा निषेध
घुगे यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानंतर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून आणि पालिकेकडून कठोर कारवाई झाली पाहिजे. भ्याड हल्ला करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे शिवसेनेचे (यूबीटी) दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे म्हणाले.