शासनाच्या परिपत्रकाला ठाणे महापालिकेने फासला हरताळ, सण सोहळ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:45 PM2017-12-11T16:45:01+5:302017-12-11T16:50:57+5:30
शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकालाच ठाणे महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची बाब समोर आली आहे. सण सोहळ्यांवर पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची उधळण केली जात आहे.
ठाणे - सण सोहळ्यांवर महापालिकाकांडून कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात येऊ नये असे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. परंतु या या शासन निर्णयाची पायमल्ली करीत ठाणे महापालिकेमार्फत अशा सण सोहळ्यांवर वार्षिक कोट्यावधींची उधळण सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकांमार्फत विविध प्रकारचे सण, जंयत्ती उत्सव, आदींसह विविध सोहळे साजरे केले जातात. यासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केली जाते. या संदर्भात एका दक्ष नागरीकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून, महापालिकांना त्यांच्याकडील निधी विविध उत्सवांसाठी खर्ची करण्यापूर्वी अधिनियमातील कलम ६३ व ६६ ची पुर्तता होत असल्याची खातर जमा करावी, तसेच अशा सोहळ्यांसाठी महापालिकांनी खर्च करु नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने देखील १० नोव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.
परंतु ठाणे महापालिकेकडून या परिपत्रकाला हरताळ फासण्याचा प्रकार केला जात आहे. शिवाय काही समाजबांधवांकडून देखील ही जंयत्ती साजरी करा, हे सोहळे साजरे झालेच पाहिजेत या समजाचे सोहळे झालेच पाहिजेत अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे एकट्या ठाणे महापालिकेमार्फत वर्षभरात तब्बल ५७ हून अधिक अशा प्रकारचे जंयत्ती, सोहळे साजरे होतांना दिसत आहेत. एक साधा सोहळा अथवा जयंत्ती जर साजरी करायची झाली तर त्यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च होत आहे. हार, फुले, चहापान, शाल आदींसह इतर खर्च त्यात येत असतो. दुसरकीडे अशा जयंत्ती आणि सोहळ्यासाठीच पालिकेकडून वार्षिक कोट्यावधींची उधळणही केली जात आहे. काही मोठे सोहळे देखील साजरे पालिकेकडून साजरे होतांना दिसत असून यासाठी तब्बल ५ लाखांचा निधी एका कार्यक्रमावर खर्ची होत आहे. त्यामुळे पालिकेने जणू शासनाच्या या आदेशालाच हरताळच फासला की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे.