ठाणे महापालिकेचा अजब कारभार : रस्ता उखडण्याचा खर्च ६० लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:36 AM2017-11-18T01:36:53+5:302017-11-18T01:37:03+5:30
कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता.
ठाणे : कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता. परंतु, आता त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे म्हणावे लागणार आहे. पालिकेने आता येथील कांदळवनावर केलेली डेब्रिजची (रस्त्याची) भरणी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ते उचलण्यासाठीदेखील तब्बल ६० लाख २४ हजार ३७५ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. रस्ता तयार करण्यासाठी सहा लाखांच्या आसपास खर्च आला होता.
कांदळवनाच्या ५० मीटर जागेपर्यंत काहीच करण्यात येऊ नये, असे आदेश असतानादेखील पालिकेने आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून कोपरी येथील खाडीकिनारी असलेले अण्णाभाऊ साठे उद्यान विकसित केले होते. यासाठी १० लाखांचा खर्च केला होता. तसेच यामध्ये एक ओपन जिमही विकसित केले होते. त्यामधील साहित्याचा खर्च चार लाख ३१ हजारांच्या घरात होता. परंतु, ही सर्व जागा कांदळवनात येत असून ते नष्ट करून ओपन जिम आणि या भागात एक किमीचा रस्ताही तयार केला होता. यासंदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाचे रोहित जोशी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर, जिल्हाधिकाºयांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, हा सर्व प्रकार घडत असतानाच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत पुन्हा पालिकेने आमदार निधीतून या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी तब्बल ५८.१९ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
आधी पालिकेने या सर्व प्रकरणांतून हात झटकले होते. परंतु, आता पालिकेनेच येथील कांदळवनात झालेला डेब्रिजचा भराव काढण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणला आहे. प्रत्यक्षात पालिकेला या ठिकाणी तयार केलेला रस्ता काढायचा आहे. परंतु, त्यासाठी रस्त्याऐवजी त्यांनी डेब्रिजचा आधार घेतल्याचे या दिसून येत आहे. जोशी यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई प्रस्तावित केल्याचे पालिकेने म्हटले आहे.
विशेष म्हणजे पालिकेनेच या ठिकाणी रस्ता तयार केला असताना ज्यांनी या ठिकाणी डेब्रिज टाकले, त्या जमीनमालक व दोषींविरुद्ध कारवाई करून दंडात्मक नोटीस बजावण्यात येऊन त्याची वसुली केली जाईल, असेही पालिकेने आता म्हटले आहे. या ठिकाणी पालिका आता वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट राबवणार असून ज्या कंपनीकडून हा प्रोजेक्ट राबवला जाणार, तिच्याकडून येथील डेब्रिज उचलले जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या बाजूची भरणी काढणे व डायघर येथे नेण्यासाठी प्रतिटन ५२५ रुपये खर्च आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, यासाठी तब्बल ६० लाख २४ हजार ३७५ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आधीच या रस्त्यासाठी आमदार निधीतून सुमारे सहा लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु, तो उखडून त्याचे डेब्रिज उचलण्यासाठी ६० लाखांचा खर्च करण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठामपाच्या विधी विभागाकडून माहिती मिळेना-
वास्तविक, अशा प्रकारचे प्रकल्प राबवताना ठाणे महापालिकेच्या विधी विभागाने त्याची माहिती देणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नाही आणि अशा प्रकारच्या कामात संबंधित कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात मिलीभगत असल्यानेच हे शक्य होत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशातूनच हा खर्च वसूल होणे अपेक्षित आहे.
- उन्मेष बागवे, ठाणे मतदाता जागरण अभियान, पदाधिकारी