ठाणे महापालिकेकडून मनसेची मागणी मान्य, विविध योजनांसाठी मिळाली मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:34 PM2018-11-15T16:34:01+5:302018-11-15T16:36:05+5:30
ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाला मनसेने केलेली मागणी प्रशासनाने मान्य करुन मुदत वाढ दिली आहे.
ठाणे: ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागरिकांना मुदत वाढ मिळावी यासाठी मनसेने मागणी केली होती. ही मागणी ठाणे महापालिकेकडून मान्य करण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच, महिला व बालकल्याण योजना, किन्नर व्यक्तींसाठी योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेणाºया लाभार्थींना दिवाळी सणामुळे तसेच शासकीय सुट्टयांमुळे आठवडाभर पात्रतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मिळालेली नाहीत. पालिकेच्या योजना जनहितासाठी असून ज्येष्ठ, नागरिक महिला यांना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुर्तता करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी मनविसे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका प्रशासनाला केली होती. ही मागणी लक्षात घेऊन पालिकेने तात्काळ मुदत वाढ केली आहे. या आधी १५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत वाढ होती. परंतू ही वाढ ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे. सायं. ५ वाजेपर्यंत लाभार्थींनी आपले अर्ज प्रभाग समिती कार्यालयात देण्याचे आवाहन पालिकेच्या समाज विकास विभागाने केले आहे.
-------------------------------------
*एक योजना वगळून इतर योजनांसाठी ही मुदत वाढ आहे. या मुदतवाढीमुळे नागरिकांचा प्रतिसाद जास्त येईल आणि या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल
- वर्षा दीक्षित, उपायुक्त, समाज विकास विभाग
*पालिकेने लोकभावनेचा विचार करुन मनसेची मागणी मान्य केली आहे. मुदतवाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.
- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनविसे