भगव्याच्या साक्षीने कोणता मासा गळाला लावणार?; महापालिकेच्या हिरवळीवर रंगला गप्पांचा फड
By अजित मांडके | Published: February 4, 2023 03:13 PM2023-02-04T15:13:20+5:302023-02-04T15:14:16+5:30
मागील सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप गट एकत्र येऊन सत्ता स्थापन झाली.
ठाणे : ठाणे महापालिकेवर लोकप्रतिनिधींचे शासन जाऊन मागील मार्च महिन्यापासून प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. त्यात मागील सहा महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जे विरोधक होते, ते एक झाले आणि जे महाविकास आघाडी करुन एकत्र होते, ते वेगळे झाले असून आता फोडोफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे झोडाझोडीचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरु असतांनाच महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांची गप्पांचा फड रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे आता या गप्पांच्या फडातून कोणता मासा गळाला लावला जाणार हे आता येणा:या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. पण भगव्याच्या साक्षीने काय कुजबुज रंगली हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप गट एकत्र येऊन सत्ता स्थापन झाली. त्याचे परिणाम स्थानिक पातळीवर देखील दिसून आले. आधी प्रत्येक बाबतीत विरोध करणारे आता, ठाण्यात सर्व चांगले असल्याचे कौतुक करु लागले. भाजप आणि शिवसेनेत जरा सुध्दा जवळीक दिसत नव्हती. मात्र आता तेच माजी नगरसेवक आता एकत्र येऊन सत्तेचे कौतुक करतांना दिसत आहेत. दुसरीकडे मागील वर्षी मार्च महिन्यापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाल्याने नगरसेवक देखील दिसेनासे झाले आहेत.
काही ठराविक नगरसेवक आजही महापालिकेत येत असतांना दिसतात. मात्र काहींनी महापालिकेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मात्र शुक्रवारी सांयकाळी महापालिका मुख्यालयातील हिरवळीवर बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाने हजेरी लावली आणि तब्बल तासभर गप्पांचा फड रंगला, चहापानही झाले. तर काहींनी इतरांना देखील महापालिका मुख्यालयात बोलावून घेतले. फोटोसेशन झाले, आणि दर शुक्रवारी अशाच पध्दतीने भेटायचे असेही निश्चित झाले.
दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या फोटोमुळे मात्र आता पालिका वुर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी हा फोटो थेट टीव्ट करुन त्याखाली एक कॅप्शन देऊन चर्चेला उधाण आणले आहे. यात त्यांनी कुजबुज भगव्याच्या साक्षीने असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ही कुजबुज नेमकी कोणती होती. याची चर्चा आता सुरु झाली आहे.
आधीच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फोडण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्यात आता या बैठकीला कॉंग्रेसचे देखील मनोज शिंदे हे हजर राहिल्याने उरल्या सुरल्या कॉंग्रेसला देखील ठाण्यातून हद्दपार करायची रणनिती तर या निमित्ताने आखली गेली नाही ना? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. तर महापालिका कशा पध्दतीने चालवायची याच्या प्लॅनींगवर चर्चा झाली नाही ना? असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे भगव्याच्या साक्षीने आणखी किती मासे गळाला लावले जाणार यावरुन आता चांगलेच रान पेटले आहे.