ठाणे पालिकेने घातली ‘रानवाटां’वर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:19 AM2017-12-28T03:19:55+5:302017-12-28T03:20:03+5:30
ठाण्यातील रानवाटा या संस्थेच्या कार्यक्रमांवर महापालिकेने बंदी घातली आहे. या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांच्या सर्व तारखा अडवून ठेवल्या असून ठाणे कलाभवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र महापालिकेने माझ्या नावाने धाडले असल्याचे रानवाटा संस्थेचे संस्थापक स्वप्नील पवार यांनी सांगितले.
ठाणे : ठाण्यातील रानवाटा या संस्थेच्या कार्यक्रमांवर महापालिकेने बंदी घातली आहे. या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांच्या सर्व तारखा अडवून ठेवल्या असून ठाणे कलाभवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र महापालिकेने माझ्या नावाने धाडले असल्याचे रानवाटा संस्थेचे संस्थापक स्वप्नील पवार यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही बंदी घातली नसून या तक्रारींचे पत्र कलाभवनचे काम पाहणाºया तेथील कर्मचाºयाने काढून त्यावर मी फक्त सही केल्याचे स्पष्टीकरण कलाभवनाच्या व्यवस्थापकाने ‘लोकमत’ला दिले.
रानवाटा ही संस्था छायाचित्रकारांशी जोडली गेली आहे. हौशी छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी या संस्थेच्या माध्यमातून छायाचित्र प्रदर्शने आयोजित केली जातात. महाराष्ट्रभरात ख्याती मिळवलेल्या या संस्थेने ठाणे कलाभवनात गेली आठ वर्षे १६ प्रदर्शने आतापर्यंत भरवली आहेत. ठाणे महापालिकेने रानवाटाचे पवार यांच्या नावाने त्यांच्याविरोधातील तक्रारींचे पत्र मंगळवारी त्यांना दिले. त्यात ठाणे कलाभवनात ९ व १० डिसेंबर रोजी या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या तयारीसाठी ठाणे कलाभवनाची कोणतीही परवानगी न घेता ७ डिसेंबर रोजी पहिल्या मजल्यावरील मासुंदा कार्यशाळेचा वापर केला. कार्यशाळेत चित्रप्रदर्शनाची तयारी करत असताना गम सांडून फ्लोअरिंग खराब केले. वेळेचा दुरुपयोग केल्याने दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी रात्री १२.३० पर्यंत कलाभवनाचा वापर केल्याचे आरक्षक नोंदीवरून दिसून आले. प्रदर्शन संपल्यावर गॅलरीतून चित्र काढून घेतले आणि बोर्ड तसेच ठेवले, अशा तक्रारी पालिकेने या पत्रात केल्या आहेत.
मात्र, या तक्रारी चुकीच्या आणि खोट्या असल्याचे पवार यांनी सांगितले. आम्ही गेली आठ वर्षे प्रदर्शन भरवत असताना या चुका करू का, असा सवाल त्यांनी केला आहे. २०१८ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या सर्व तारखा पालिकेने अडवून ठेवल्या आहेत. त्यासंदर्भात केलेले अर्ज अडवले आहेत. आमच्या कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. मुळात आम्ही दिलेल्या कार्यक्रमांच्या वेळा पाळतो. साफसफाई करून आमचा माणूस रात्री उशिरा बाहेर पडला होता, त्यामुळे आम्ही उशिरापर्यंत कोणताही कार्यक्रम सुरू ठेवला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
याबाबत, व्यवस्थापक दत्ता गोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता आधी त्यांनी भरपूर वाद घातला. नंतर रानवाटा ही संस्था फ्रेम टाकून देते, कार्यक्रम वेळेत संपवत नाही. कोणत्याही वस्तू उचलत नाही, असे सुरुवातीला सांगितले. त्याबाबत स्पष्टीकरण विचारल्यावर कलाभवनमध्ये असलेले कर्मचारी पगारे यांनी या तक्रारींचे पत्र काढले आणि त्यावर मी फक्त सही केली. मी जाऊन पाहणी केली नाही. परंतु, आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कोणतीही बंदी घातली नाही. कार्यक्रमांच्या तारखा अडवलेल्या नाहीत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>सोशल मीडियावर संताप व्यक्त
ठाणे महापालिकेने दिलेल्या या तक्रारींच्या पत्राविरोधात सोशल मिडियावर संताप व्यक्त होत आहे. जाणूनबुजून हे करण्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रत्येक आर्ट गॅलरीमध्ये मदतनीस असतात. ठाणे कलाभवनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हे पद नाही. त्यामुळे कलाकाराला प्रदर्शनाची तयारी करताना मदतनीस नसल्याने कलाकारांचा प्रचंड गोंधळ उडत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.