ठाणे महापालिकेने बजावल्या कळवा रुग्णालयातील दोघांना नोटीस
By अजित मांडके | Published: December 21, 2023 05:35 PM2023-12-21T17:35:16+5:302023-12-21T17:41:09+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यु झाला होता.
अजित मांडके,ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात |ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल देखील तयार झाला होता, मात्र कारवाई कोणावरही करण्यात आली नव्हती. या संदर्भात अधिवेशान मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयातील अधिव्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापिका यांना नोटीस बजावली असून तुमच्या कारवाई का करु नये असे सांगत २४ तासात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आणखी काहींवर देखील येत्या काही दिवसात कारवाई होण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
ठाणे महापालिकेचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे कळवा भागात आहे. याठिकाणी रोजच्या रोज २ हजार २२०० रुग्ण ओपीडीवर उपचारासाठी येत असतात. याठिकाणी ५०० ची बेड क्षमता आहे. परंतु मधल्या काळात या रुग्णालायवरील ताण अधिकच वाढल्याचे दिसून आले होते. रुग्णांना उपचारासाठी बेडसुध्दा उपलब्ध नव्हते. अशातच १३ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात एकाच वेळी तब्बल १८ रुग्णांचा मृत्यु झाला आणि हे रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले. यावेळी येथील रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिसून आला होता. रुग्णांच्या नातेवाईकांसह राजकीय मंडळींनी देखील रुग्णालयाच्या कारभारावर आगपाखड केली होती. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ या संदर्भात राज्यस्तरीय चौकशी समिती नेमली आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगितले होते.
चौकशी समितीने देखील अगदी दुसºया दिवसापासून रुग्णालयातील डॉक्टरांची शाळा घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या घटनेचा अहवालही तयार केला. परंतु मधल्या काळात तो अहवाल पुढे न आल्याने कोणावरही कारवाई झाली नव्हती.
दरम्यान, नागुपर येथील अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळवा रुग्णालयातील अधिव्याख्याते आणि महिला सहयोगी प्राध्यापिका अशा दोघांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. २४ तासात या दोघांना आपली बाजू मांडण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या नोटीसीद्वारे समितीने दिलेल्या अहवालानुसार तुमच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करु नये असे नमुद करण्यात आले आहे. तसेच या अहवालानुसार आणखी पाच ते सात जणांना देखील नोटीस बजावल्या जाण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.